Breaking News

प्रवेश परीक्षेत ‘प्रवरा’चे विद्यार्थी ठरले ‘टॉपर’

प्रवरानगर प्रतिनिधी 

बारावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील या प्रवेश परीक्षांमध्ये टॉपर ठरलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या माध्यमिक विभागाचे प्रा. विजय आहेर यांनी दिली.

ते म्हणाले, संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा अवधूत जाधव या विद्यार्थ्याने ९५. ८४ टक्के गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. नवे रेकॉर्ड निर्माण करताना भौतिकशास्त्र आणि गाणितामध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने देण्यात येणारे भौतिकशास्त्रासाठीचे पहिले पारितोषिक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील या विद्यालयातील अवधूत जाधव या विद्यार्थ्याला मिळाले. हाच विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पी. सी. एम ग्रुप साठीच्या आबासाहेब नरवणे स्मृती पुरस्काराचादेखील मानकरी ठरला. तसेच त्याने जे. ई. ई. या प्रवेश परीक्षेमध्ये ३६० पैकी १५४ गुण मिळविले. तसेच पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातीलच संकेत शेळके ३६० पैकी १३६ गुण आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये यशराज खर्डे याने ७२० पैकी ५५६ गुण, अभिजित कार्ले ४३० गुण, आणि प्रवरा पब्लिक स्कूलचा अथर्व शिरसाठ हे विद्यार्थी जे. ई. ई. या प्रवेश परीक्षेमध्ये टॉपर ठरले आहेत. 

राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य दिगंबर खर्डे, प्राचार्य सयराम शेळके आदींनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.