Breaking News

अखेर पाथर्डी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांची उचलबांगडी !


पाथर्डी विशेष प्रतिनिधी - पाथर्डी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळयांचा अपेक्षित कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच त्यांची तातडीने बदली झाल्यामुळे सर्व स्तरांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची बदली जरी प्रशासकीय असली तरी दै.लोकमंथनने त्यांच्या जुलमी, भ्रष्टाचारी व अरेरावी वर्तनाबाबत सातत्याने सडेतोड लिखाण केल्याने त्यांची बदली करणे प्रशासनाला भाग पडले. या बदलीच्या ताज्या पार्श्‍वभूमिवर, मुख्याधिकार्‍यांनी केलेल्या अवैध गाळे हस्तांतरणाविषयी कुठलाही आडपडदा न ठेवता दै.लोकमंथनने रोखठोक लेख लिहीला होता. हे वृत्त त्यांची बदली होण्याकामी तत्कालीन कारण ठरल्याची चर्चा पाथर्डीच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात आवर्जुन केली जात आहे.
मुख्याधिकारी वसुधा कुरणावळांचा, पाथर्डी पालिकेतील सेवेचा संपूर्ण कार्यकाळ वादग्रस्तच ठरला. त्यांच्या कार्यकाळात, त्यांना सन्मानजनक ठरेल असे एकही विधायक काम त्या करू शकल्या नाहीत. त्यांच्या जुलमी व अरेरावी कार्यपद्धतीमुळे त्यांचे बगलबच्चे वगळता संपूर्ण पालिका व शहर वेठीस धरल्याचे चित्र निर्माण झाले होते. पालिकेतील कर्मचार्‍यांना तर त्यांनी त्राहीमाम करुन सोडले होते. अतिक्रमण हटविण्याची धमकी देत कित्येक दुकानदारांची पिळवणूक करताना, एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या खंडणीच वसूल केली. शहरातील कोणतीही समस्या ही भ्रष्टाचाराकरिता त्यांच्यासाठी चालून येणारी नामी संधी होती. कोणत्याही समस्येचे पर्यवसान पैसा उपटण्यासाठी घडवून आणण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या अपरोक्ष नाही तर त्यांच्या समक्ष त्यांच्या अनागोंदी कारभारावर दै. लोकमंथनने सातत्याने कोरडे ओढले. महापुरुषांच्या जयंतीला दांडी मारण्याचा विषय असेल किंवा प्रत्येक कामातील भ्रष्टाचाराचा विषय असेल, कोणत्याही बाबतीत लोकमंथनने परिणामांची पर्वा न करता त्यांच्या उर्मटपणावर निर्भिडपणे लिखाण करुन सातत्याने शहरवासियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आज त्यांच्या वादग्रस्त कार्यकाळाची कुठलिही भलामण न करता त्याच भाषेत त्यांच्या कारकिर्दीचा परामर्श घेतला आहे. पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांनी बुजगावण्यांपेक्षा काडीमात्रही जास्त किंमत दिली नाही. आणि त्यांची दखलही घेतली नाही. म्हणूनच त्यांच्यासारखे अधिकारी, मग ते कोणत्याही विभागातील असोत ते देशासाठी किंवा राज्यासाठी लांछनास्पदच आहेत.