Breaking News

‘सेल्फ चेक’ने लाटली मयताची अनुदानित रक्कम, जिल्हा बँकेच्या बिरेवाडी शाखेतील प्रकार

संगमनेर/प्रतिनिधी।

तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथील जिल्हा सहकारी बँकेत बिरेवाडी येथील शेतकरी कै. रामभाऊ मनाजी शेंडगे यांचे बचत खाते आहे. त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या शासकीय अनुदानाचे पैसे वेळोवेळी खात्यातून काढले गेल्याची तक्रार कै. शेंडगे यांच्या मुलांने केली. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

कै. शेंडगे यांना बिरेवाडी येथे साडेचार एकर शेती आहे. वारसदार म्हणून पत्नी, तीन मुले, व एक मुलगी असा परिवार आहे. हे सर्वजण स्वतंत्र राहात आहेत. सन २०११ साली वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या शासकीय अनुदानाचे पैसे वेळोवेळी खात्यातून काढले गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा हरिभाऊ शेंडगे यांनी साकुरच्या एडीसीसी बँकेत केली. मात्र साकुर शाखेने तक्रार घेण्यास नकार दिला. म्हणून त्यांनी नगरच्या मुख्य शाखेत याबाबत तक्रार केली. मयत खातेदार अंगठेबहाद्दर असल्याने त्यांना बँकेने चेकबुक दिले नव्हते. त्यामुळे या आर्थिक व्यवहारात प्रत्यक्ष खातेदार नसतानाही सेल्फ चेकने पैसे काढले गेले. बँकेच्या एकाही कर्मचाऱ्याला या प्रकरणाचा संशय कसा आला नाही, असा प्रश्न निर्माण होऊन बँकेच्या विश्वासाला तडा गेला आहे. तसेच यात बँकेतील कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यता आहे. तक्रार आल्यानंतर बँकेने सारवासारव करुन संबंधितांकडून पुन्हा पैसे भरुन घेत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.