Breaking News

समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठांचा सन्मान करणे आवश्यक - राजकुमार बडोले


मुंबई - समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची आवश्यकता असून या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल, असा विश्‍वास सामा जिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात बडोले बोलत होते.
यावेळी बडोले म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे ज्येष्ठांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मुले शहरांकडे नोकरी,व्यवसायाच्या शोधात तर उच्च शिक्षित युवक परदेशात स्थलांतरीत झाल्यामुळे ज्येष्ठ आई-वडिलांना गावाकडे एकटेच जीवन कंठावे लागते. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांच्यामुळे आपण हे जग पाहिले, त्यांची देखभाल करणे त्यांचा आदर, सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
वडिलांच्या संपत्तीवर दावा करून भांडणार्‍या आणि वडिलांनी संपत्ती आपल्या नावावरच करावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणणार्‍या तीन भावंडांचा दाखला देत बडोले म्हणाले,अखेर त्या ज्येष्ठ नागरिक ास वृध्दाश्रमाचाच रस्ता धरावा लागला ही दुर्दैवी बाब आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्याला रात्रंदिवस जपले, आपल्याला शिकवले, संस्कारीत केले त्यांच्यावर ही वेळ यावी हे योग्य नाही. ज्येष्ठावरील अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी कायदा असला तरी सर्वच प्रश्‍न कायद्याने सोडविता येत नाही. प्रत्येकाने आपल्या वडिलधार्‍यांचा सन्मान करतानाच त्यांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
यावेळी ज्येष्ठ सिनेअभिनेते रमेश देव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या आयुष्यात आजोबा, वडील आणि आई या ज्येष्ठांनी ऐतिहासिक भुमिका निभावल्यामुळेच आपण यशस्वी व्यक्ती घडल्याची कबुली दिली.