Breaking News

शाळेला विद्यार्थी देता का रे कोणी विद्यार्थी?


राहाता बाळासाहेब सोनवणे
शासनाच्या धोरणाने गावोगावी इंग्रजी आणि मराठी माध्यम शाळांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत गावात मुलांची संख्या कमी होत आहे. ‘हम दो’ ‘हमारे दो’च्या जमान्यात शाळांना विद्यार्थी मिळणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे पट वाढविणे आणि विद्यार्थी मिळविण्यासाठी इंग्रजी अन् मराठी शाळांमध्ये एकमेकांत मोठी स्पर्धा सुरू आहे. पटाअभावी ‘अतिरिक्त’ होऊन आपली गैरसोयीची बदली होऊ नये, यासाठी शिक्षकांना तर शाळा बंद पडू नये, यासाठी इंग्रजी शाळांचे शिक्षक व संस्थाचालक घरोघरी विद्यार्थी गोळा करीत आहेत. 

शाळांचा वाढता बाजार, मुलांचा तुटवडा आणि वाढत्या स्पर्धेत मुलांना आपल्याच शाळेत खेचण्यासाठी कोणी दर्जा आणि गुणवत्तेची भाषा बोलतात, कोणी उज्वल भविष्य आणि एका छताखाली आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे, विविध प्रकारचे ज्ञान, नवनवीन शिक्षण अशी जाहिरात करून मोठी स्वप्न दाखवत आहेत. तर काही शाळा आय. एस. ओ.ची आमिष आणि इमारतीची आणि व इतर देखावे दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यावर भर देत आहेत. शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा अधिकार या कायद्यान्वये जाती आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण दिले आहे. परंतू यातही गुणवत्तेत दर्जेदार असणा-या शाळांत प्रवेश देताना ज्याचा ‘वशिला तोच काशिला’ असाच प्रकार व्हायचा. त्यावर चाप लावण्यासाठी सरकारने ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्याचा गरजूंना किती फायदा होतो, हे आता आगामी काळच सांगेल.


चिमुकल्यांच्या ‘प्रवेश दिंड्या’ चर्चेत

काही अपवादात्मक इंग्रजी माध्यमांच्या व मराठी माध्यमांच्या शाळा खरोखरच दर्जेदार आहेत. त्यांचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी ‘पुढे पाठ मागे सपाट’ अशी अवस्था शिक्षकांची व शिक्षणाची झाली आहे. तर जमाना बदलल्याने ‘हम दो’ ‘हमारे दो’च्या जमाण्यात विद्यार्थी शोधण्याची, शाळेत मुले दाखल करून घेण्यासाठी प्रवेश दिंड्या काढण्याचे, स्वागताचे उपक्रम राबवावे लागत आहेत.