Breaking News

विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करुन मारहाण

जळगाव  - विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.

ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अ‍ॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
जळगावात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात राहणारी मातंग समाजाची तीन मुलं भटका जोशी समाजातील आरोपीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. हा प्रकार समजताच आरोपींनी तिघांना नग्न करुन अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांची गावात धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण केली.
या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला या गावात राहायचं आहेफ असं सांगत पीडितांच्या कुटुंबीयांनीही तक्रार नोंदवण्याबाबत टाळाटाळ केल्याचं म्हटलं जात आहे.