Breaking News

सुपा परिसरात वादळाचा तडाखा, घरावरील पत्रे उडाले


सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात शनिवारी दुपारी 2 वाजता वादळी वार्‍याने घरावरील पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर सुपा-वाळवणे रोडलगत कोल्हे वस्तीवरील रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड वादळाने रस्त्यावरच पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

गेल्या वर्षी वरुणराजाने जोरदार आगामण केल्याने शेतकर्‍यांनी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले, मात्र उत्पादीत केलेल्या मालाला बाजाभाव मिळत नसल्यामुळे कांदा साठवणुकीला शेतकर्‍यांनी प्राधान्य दिले. पाऊस मोठ्या प्रमाणात होऊनही एप्रिल, मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची उणीव भासू लागली.
चालू वर्षी सुपा परिसरातील गावात जलसंधारणाच्या माध्यमातून नदीवर बंधारे, पाझर तलाव, नाला बंडींग, समतलचर, केटीवेअर व नदी खोलीकरण आदी अनेक कामे पावसाळ्यापुर्वी मार्गी लागल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ होणार आहे.

शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पावसाळ्यापूर्वीची मशागत पूर्ण केल्यानंतर जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे, मे महिन्यातील दि.24 मे रोजी रोहिनी नक्षत्र सुरू झाले असून 1 जून पासून ढग भरून येऊ लागल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.शनिवारी दुपारी वादळी वार्‍याने घरावरील पत्रे उडाल्याने, अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत आभाळ दाटून आले होते.


सतत विद्युत पुरवठा खंडीत, भोयरे गांगर्डा येथिल मोबाईल रेंज गायब
पावसाचे वातावरण झाल्यास सुपा येथिल सब्टेशन मधून आपधूप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस येथिल विद्युत पुरवठा बंद केला जातो, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिव्र उष्णतेत रात्र-रात्र जागून काढण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. सब्टेशन मध्ये महिला ऑपरेटर ठेवल्या असुन, फोन केल्यास त्या ग्राहकांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने, ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची योग्य वेळी दखल घ्यावी अन्यथा माहिती सेवा समितीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी 3 वाजता वादळात सिंगल फेजचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद असल्याने भोयरे गांगर्डा येथिल जिओचे टावर बंद झाल्याने गावचा संपर्क तुटला होता. टावरसाठी येणारे डिझेल परस्पर विकले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर यात सुधारणा न झाल्यास टावरला सील ठोकण्याचा इशारा उपसरपंच दौलत गांगड यांनी दिला आहे.