Breaking News

गौरी लंकेश हत्याप्रकरणी चौघांना अटक चारही जण सनातन व हिंदू जनजागृती समितीशी संबधित


पुणे/प्रतिनिधी : कर्नाटकातील सुप्रसिद्ध पत्रकार व बंगळुरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) चौघांना अटक केली असून यातील एकजण चिंचवडगाव येथून अटक केली आहे. एसआयटीने अटक केलेले चारही जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबधित असल्याचेही पोलीस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवड गावातून अमोल काळे या संशयिताला विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) अटक केली आहे. बंगळुरुमधील आरआरनगरमध्ये 5 सप्टेंबर 2017 मध्ये घरासमोर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर कर्नाटकासह देशभरात विविध ठिकाणी निषेध दर्शवण्यात आला होता. बंगळुरुमधील आरआरनगरमध्ये घराबाहेर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधी लिखाण करणार्‍या गौरी लंकेश यांचे हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.
या हत्याप्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार यांच्या विरोधात एसआयटीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. त्याने गोळ्या झाडणार्‍यांना लंकेश यांच्या घरापर्यंत नेणे व मार्गदर्शन क रण्याची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात म्हटलेले होते. त्यानंतर या हत्याप्रकरणात अमोल काळे उर्फ भाईसाहब उर्फ संजय भन्सारे (39, रा. चिंचवडगाव), अमित देगवेकर उर्फ प्रदीप महाजन (38), मनोहर येडावे उर्फ मनोज (वय 28) या तिघांसह एकूण पाच संशयितांना गुरुवारी (दि.31) एसआयटीने अटक केली. या अटकेनंतर लंकेश हत्याप्रकरणाचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. अटक केलेल्या पाच संशयितांपैकी अमोल काळे हा चिंचवडमधील मालिक कॉलनीतील अक्षय अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. तसेच, एसआयटीने अटक केलेले हे चार जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचेही पोलीस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.