Breaking News

मुले पळविणारी परप्रांतियांची टोळी सक्रिय ? ग्रामीण भागात अफवांचे फुटले पेव


कोपरगाव / गणेश दाणे 
पावसाळा सुरु झाला असला तरी दिवसभर आभाळाकडे नजर टाकत रात्री ग्रामीण भागात अनेक गावांचा जागता पहारा सुरु आहे. ‘चोर आले आणि गेले’ या अफवांची रंगतदार चर्चा सध्या गावागावात दिसून येत आहे. या अफवांमुळे सामान्यांची चांगलीच भंबेरी उडाली असून पंचक्रोशीत सर्वत्र भितीचे वातावरण आहे. 

सोशल मिडियाच्या माध्यमातून दररोज व्हॉट्सअपवर अशा अफवांचे मेसेज व्हायरल होत आहेत. परप्रांतीय लोकांची टोळी महाराष्ट्रात आली असून ते स्त्रियांचा वेश परिधान करुन लहान मुले पळवितात. रात्री चोरीसाठी येऊन माणसेही मारतात. अशा अफवा सध्या पसरविल्या जात आहेत. दररोज रात्री घरातील स्त्रिया अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या मुलांना आज कुठे काय घडले, दाखव बरं, असे अगदी कुतुहलाने विचारत व्हॉटसअपवरुन आलेले व्हिडिओ पाहत चर्चा करत आहेत.

अनोळखी व्यक्ती रस्त्याने जाताना दिसली तरी त्याच्या पावलांच्या आवाजात सर्वसामान्यांना सध्यातरी चोरांचाच सूर जाणवत आहे. प्रत्यक्षात अजूनतरी कुठेही चोरी किंवा दरोडा झालेला नाही. ही केवळ वरवरची चर्चा असली तरी महाविद्यालयीन मुले, मुली वस्ती- वाडीवर राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. या अफवेमुळे जास्त प्रकाश देणारे बल्ब आणि बँटरीची सध्यातरी खरेदी जोरदार सुरु आहे.

सोशल मिडियाचा वापर भिती घालविण्यासाठी व्हावा 

ही केवळ अफवा असून पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत असा कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवाही पसरवू नये. अफवांवर अल्पबुद्धी आणि निरक्षर व्यक्ती पटकन विश्वास ठेवतात. यासाठी तरुणांनी सोशल मिडीयाचा वापर भिती निर्माण करण्याऐवजी ती घालविण्यासाठी करावा. 

रामेश्वर तुरनर, पोलिस उपनिरीक्षक, ग्रामीण पोलिस स्टेशन, कोपरगाव.