Breaking News

नांदगांव येथे लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच नववधू सोने घेऊन फरार


नांदगाव, दि. 11, जून - पोखरी येथे लग्नाच्या तिसर्‍या दिवशीच वधू परत मुळासाठी गेलेली असतांना परत आलीच नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदगाव पोखरी येथील बाबुराव देवरे यांचा मुलगा भगवान याच्यासाठी वधू पाहण्याचे काम सुरू होते. परंतु विवाहास मुलगी मिळत नसल्याने चांदोरा येथील सोमनाथ भुरक नामक व्यक्तीने देवरे यांना जालना, परभणी भागातील मुलगी दाखवली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मनमाड येथे स्थानकावर मुलगी दाखविण्यात आली अश्‍विनी नामक या मुलीबरोबर मुलीची मावशी व छाया नावाची बहीण तेथे आलेले होते. मुलगी मुलास आवडली. त्यानंतर रोख रक्कम मध्यस्तीच्या हस्ते एजंटला देण्यात आली. लग्नासाठी वधू अश्‍विनीला सहा हजार रुपयाचे सोन्याचांदीचे दागिने मुलाच्या वडिलांनी घेतले. त्यानंतर काका, मावशी यांना ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यात आली. मध्यस्थी करणारा सोमनाथ भुरक, बळीराम चव्हाण, बाबुराव देवरे, भाऊसाहेब नागरे यांच्या समक्ष रक्कम देण्यात आली. त्यानंतर विवाह पार पडला त्यानंतर दोन दिवसांनी नव्या नवरीला पहिले मूळ लावण्यासाठी नववधूचा मेहुणा संजय मोरे तिला परत आणण्यासाठी आला. दोन दिवसांनी मुलीला घेऊन जा असे सांगून मोरे यांना औरंगाबादचा पत्ता दिला. मुलीला परत आणण्यासाठी मुलाचे वडील गेले पण पत्ता चुकीचा दिला होता. मुलगी त्याठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या घरच्यांशी संपर्क साधला असता दुसरी मुलगी आणून देतो असे सांगण्यात आले. दरम्यान, आपण फसलो असल्याचा प्रकार देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. येथील सामाजिक कार्यकर्ते भगीरथ जेजुरकर यांच्या मदतीने या प्रकरणातील एजंटसह इतर संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले.