Breaking News

पाथर्डी सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मुस्लिम कुटुंबियांना कपडे व साहित्य वाटप


पाथर्डी विशेष प्रतिनिधी - पवित्र रमजानच्या महिन्यात गोरगरिबांची मदत करतो , त्याला अल्ला( ईश्‍वर ) मदत करतो . गरिबांमध्ये ईश्‍वराचे रूप पाहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा उपक्रम सामाजिक ऐक्य व जातीय सलोख्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. असे मत मुस्लिम धर्मगुरू मौलाना शकील शेख यांनी व्यक्त केले. सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मुस्लिम समाजातील अत्यंत गरीब असलेल्या अठरा व्यक्तींना रमजान सणासाठी पुर्ण पोषाख व शिरखुर्म्याचे साहित्य दिले. अशा प्रकारचा उपक्रम तालुक्यात प्रथमच घेण्यात आला. हातातोंडाची लढाई लढताना सणवार साजरे करण्यासाठी कर्ज काढणे किंवा सणापासून दूर राहणे पसंत करणार्‍या कुटुंबियांना अत्यंत महागडी अशी मदत मिळाली. या सर्व व्यक्तींच्या चेहर्‍यावरील समाधान सुद्धा समाज बांधवांनी प्रथमच पाहिले. मुस्लिम समाजातील विधवा, अपंग ,परीत्यक्ता असे एकाकी जिवन जगणार्‍या महिलांना मंडळाकडून मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबियांकडून आधार मिळाला अशी भावना विविध वक्त्यांनी केली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार पंकज नेवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक कवी कैलास दौंड , माजी नगरसेवक चांद मणियार ,रामनाथ बंग, अँड प्रतीक खेडकर , डॉ अभय भंडारी , जमीर आतार , इजाज शेख , पत्रकार नारायण पालवे आदी उपस्थित होते. मौलाना शकील शेख म्हणाले सर्व समाजबांधव गुण्या गोविंदाने नांदावेत, समाजात अन्याय अत्याचार अधर्म व अनिती संपून धर्माचे राज्य म्हणजेच इश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे असा प्रयत्न मंडळाने कृतीतून केला आहे. खर्‍या अर्थाने सुवर्णयुगाची सुरवात सुवर्णयुग मंडळाकडून झाल्याने पुढील सणासाठी गोरगरीब गरजू कुटुंबांना अशाप्रकारे मदतीसाठी अनेकांनी पुढे यावे गरिबाला व माणुसकीला जात-धर्म नसतो .अशा लोकांमध्ये मात्र ईश्‍वरत्व अधिक असते. यावेळी बोलताना लाभार्थी महिलांपैकी एक ज्येष्ठ महिला रजिया शेख म्हणाल्या जगावे कसे असा प्रश्‍नन आमच्या समोर आहे. दिवसभर कष्ट करतो तेव्हा कुठे दोन वेळचे पोट भरते .खर्चात बचत व्हावी म्हणून उपवास करायचे. सण साजरा करण्यासाठी काहीही पर्याय नव्हता तरीही सुवर्णयुग मंडळाच्या वतीने मिळालेले साहित्य अल्लाहाने पाठवून गरिबांची लाज राखली. आम्ही सणासाठी कर्ज घेऊन वर्षभर मोल मजुरी करून फेडले असते , आता अशी वेळ येणार नाही. आनंदाने सण साजरा करू म्हणताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे ,सूत्रसंचालन अजय भंडारी यांनी केले तर आभार विजय गर्जे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुकुंद लोहिया , अभय गांधी, दिगंबर जोजारे , अमोल कांकरिया, परशुराम पंडित ,संदीप पानगे, योगेश वाखुरे , दत्ता पंडित, किरण महानवर ,गणेश महालकर , पारस कर्नावट आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.