Breaking News

‘मुळा’च्या राखीव पाणीसाठ्याचा झाला वापर; पाणीपुरवठा योजनांवर ‘कपाती’चे संकट


राहुरी शहर प्रतिनिधी : जिल्ह्याला जीवनदायिनी ठरलेल्या मुळा धरणात केवळ ४ हजार ८०० दशलक्ष घनफूट इतका निचांकी पाणीसाठा शिल्लक आहे. ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आपत्कालिन म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अख्त्यारित येत आहे. मात्र या धरणातील राखीव पाण्याचाही वापर झाला आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या पाण्यावर कोणाचे नियंत्रण आहे, असा सवाल लाभक्षेत्रात होत आहे. नव्याने पाणी येण्यास आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पाणीयोजनांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुळा धरणात सध्या केवळ १८ टक्के पाणी साठा आहे. यातील ३०० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यास उपयुक्त आहे. ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट साठा झाल्यानंतर पाणी योजना तळ गाठतात, असा अनुभव आहे. तरीही सर्वच पाणी योजनांच्या जँकवेलमध्ये यापूर्वीच चर खोदलेले आहेत. असे असले तरी गाळामुळे यातही मर्यादा येतात. अशा परिस्थितीत नवीन पाण्याची आवक होण्याची वाट पहावी लागते. तसेच पाणी कपातीचे हत्यारही उपसावे लागते. मुळा धरणातून मे महिन्याच्या शेवटी पहिल्या आठवड्यापर्यंत शेती सिंचनाचे आवर्तन सुरूच होते. परिणामी धरणातील पाणी साठा निचांकी पातळीवर आला. 

दरम्यान, प्रशासकीय पातळीवर पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच ५०० दशलक्ष घनफूट साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याचे सांगण्यात आले. मात्र मृत साठ्याव्यतिरिक्त केवळ ३०० दशलक्ष घनफूट साठा धरणात जून ११ अखेर शिल्लक आहे. धरणात नव्याने पाणी जमा व्हायला जूनअखेर किंवा जुलै महिनाही उजाड़तो. मागील वर्षी दि. ३० जून २०१७ ला नवीन पाण्याची आवक सुरु झाली होती. तेव्हा पाण्याचा साठा ४ हजार ९०० वर होता. २०१६ ला ५ जुलै. २०१५ ला २५ जून, २०१४ ला १७ जुलै रोजी नवीन पाण्याची आवक सुरु झाली होती. 

याला जबाबदार कोण? 

शहराच्या व ग्रामीण भागातील पाणी योजनांची भर पडलेली असल्याने दिवसागणिक ‘मुळा’चा पाणीसाठा तळ गाठत आहे. प्रशासकीय पातळीवर पाणी कपातीबाबतही लाभक्षेत्रात अजूनही कोणतीही हालचाल नाही त्यामुळे याबाबतही लाभक्षेत्रात उत्सुकतेने चर्चा झडत आहे. ‘मुळा’चा पाणीसाठा निचांकी पातळीवर गेला, हे खरे आहे. मात्र असे असले तरी नवीन पाण्याची आवक केव्हा होईल, हे अधांतरी आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाण्याचा साठा निचांकी झाल्याने तो कसा झाला, याला जबाबदार कोण, अशा प्रश्नांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.