Breaking News

नानी नदीवरील बंधार्‍याच्या कामाच्या चौकशीची मागणी


शेवगाव प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील वरूर गावातील नानी नदीवरील निकृष्ट बंधार्‍याची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन आज वरूर येथील शेतकर्‍यांनी शेवगांवचे तहसीलदार दीपक पाटील यांना दिले.
जलसंधारण व लघु सिंचन विभाग अहमदनगर यांच्या मार्फत जवळपास दोन वर्षापासून वरुर येथील नानी नदीवर बंधार्‍याचे काम चालू आहे. या बंधार्‍यासाठी वापरण्यात येणारी वाळू माती मिश्रित असून सिमेंटही हलक्या दर्जाचे वापरलेले आहे. त्याच बरोबर स्लॅब भराव, पिचिंग, दरवाजे इत्यादी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे हा बंधारा फुटण्याची शक्यता संबंधित शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. ठेकेदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे. आराखड्याप्रमाणे बंधार्‍याचे काम चालू नसल्याची तक्रार येथील शेतकर्‍यांनी वेळोवेळी तोंडी स्वरूपात जलसंधारण विभागाचे उपअभियंता औटी यांच्याकडे केली. परंतु संबंधित उपअभियंता औटी हे या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांनी उपअभियंता औटी यांना याबद्दल जाब विचारला असता उपअभियंता औटी यांनी मग्रुरीचा भाषेमध्ये उत्तर दिले. शेतकर्‍यांना अशी अरेरावीची भाषा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी व संबंधित बंधार्‍यामध्ये असलेले ठेकेदाराची व अभियंता यांची चौकशी करून न्याय मिळावा व संबंधित बंधार्‍याचे काम शासकीय आराखड्याप्रमाणे करावे अशा आशयाचे निवेदन शेवगावचे कृषी अधिकारी साळी साहेब यांना देण्यात आले.

शेवगाव तालुक्यामध्ये स्थानिकस्तर कार्यालयाकडून झालेल्या कामांच्या खूप तक्रारी आहेत. परंतु वरिष्ठ संबंधित ठेकेदार व अभियंता यांना पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी या मुजोर अभियंत्याची मुजोरी तालुक्यांमध्ये वाढत असल्याची चर्चा आहे.