Breaking News

वादळामुळे डाळिंब उत्पादकांचे नुकसान


कोपरगाव शहर प्रतिनिधी 
तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे २५ एकर क्षेत्रावरील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्याचप्रमाणे बाबासाहेब उपाध्ये यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे उडाले. या भागाची आ. स्नेहलता कोल्हे यांनी आज {दि. १० } पाहणी केली. 

याप्रसंगी तहसिलदार किशोर कदम उपस्थित होते. वादळाचा प्रचंड जोर असल्याने डाळिंबाची झाडे खोडासह उन्मळून पडली. ठिबक सिंचनांच्या संचासह पिकांचे मोठे नुकसान झाले. वीजेचे खांब शेतात पडले आहेत. तर अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. या वादळात मोठमोठी लिंबाची तसेच बाभळींची झाडे जमीनदोस्त झाली. या वादळी पावसामुळे सुरेश देशमुख यांचा जुना १० एकर तर नवीन पाच एकर डाळिंबाची बाग वादळाच्या तडाख्यात सापडली. प्रकाश गोर्डे यांच्या डाळिंब बागेचेही नुकसान झाले. 

या पाहणी दौऱ्यात आ. स्नेहलता कोल्हे यांच्यासमवेत गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडलाधिकारी एस. एम. गावित, कृषी सहायक के. बी. शिंदे, ‘संजीवनी’चे संचालक अशोक औताडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शर्द थोरात, हरिभाऊ गोर्डे, निवृत्ती गोर्डे, गजानन मते, बाबासाहेब गोर्डे, रामनाथ सहाणे, बाबासाहेब देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.