Breaking News

काँग्रेसचा गाढवांना घेऊन तहसिलवर मोर्चा


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) शहरातील गाढवांवर वाळू वाहतूक करणार्‍या लोकांना महसुलने ताब्यात घेतल्याने लोकशाही विचार मंच व नेवासा शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांनी गाढवांना घेऊन अचानक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. नेवासा शहरात अनेक वर्षांपासून गाढवांवर वाळू वाहतूक करणारे कुटुंब आहेत. ही कुटुंबे पिढ्यानपिढ्या हा धंदा करतात मात्र एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याने नेहमी प्रमाणे वाळूवाल्यांच्या कुटुंबातील महिला गाढवाद्वारे वाळू भरत असताना नदीपात्रातून त्याची व्हिडिओ चित्रफीत करुन महसूल प्रशासनाला देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महसूल प्रशासनाने बुधवार दि 13 जून रोजी गाढवाद्वारे वाळू करणार्‍यांवर कारवाई करुन तिघांसह एका महिलेला महसूल कारवाई पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेस शहराध्यक्ष सुखधान यांना दिली असता त्यांचे म्हणने ऐकून घेऊन त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून नेवासा पंचायत समिती कार्यालयापासून गाढवांसह तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.
तहसील कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर पोलिस व महसूल प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलतांना सुखधान म्हणाले की शहरातील बांधकामांना गाढवावरून वाळू देण्याचे काम करून हे गोरगरीब कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात मात्र या गरिबांवरच कारवाई केली जाते. मात्र परिसरात ढंपरने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई होत नाही. एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी ब्लॅकमेल करण्याचे धंदे करतात. अधिकार्‍यांना ही याचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो. त्याच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी हे कृत्य केले असून त्यांच्यात धमक असेल तर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध बांधकाम सुरू असून त्यांच्याकडे लक्ष द्यावे असे असताना रोजंदारीवर काम करत असलेल्या लोकांकडून यांना अपेक्षा आहे ती पूर्ण न झाल्याने त्यांनी हे कृत्य केले आहे.
अवैध वाळू उपश्यमुळे आज पर्यंत अनेक ठिकाणी खून झाले आहे. तसेच तहसीलदारांवर व कर्मचार्‍यांवर ही हल्ले झाले असून सरकार ने वाळू खुली करावी त्यामुळे शासनास विस पटीने अधिक महसूल जमा होईल तसेच गुन्हेगारी कमी होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न सुटेल काही राज्यांमध्ये वाळु खुली करण्यात आली आहे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
 
गाढवावरून वाळू वाहतूक करणार्‍यांवर प्रतिबंधकात्मक कारवाई केली असून त्यांचे जबाब घेऊन सोडण्यात आले आहे- 
ज्योतिप्रकाश जायकर
निवासी नायब तहसीलदार