Breaking News

ऊस पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे - नवले


भेंडा (प्रतिनिधी) - ऊस पिकातील हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाण्याचे ऊस विकास अधिकारी मंगेश नवले यांनी केले. नेवासे तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना आयोजित केलेल्या ऊस विकास कार्यक्रमात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे व नगर जिल्हयात अद्याप ही पुरेसा पाऊस न झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (ज्वारी,बाजरी, मका इ.) खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतकर्‍यांच्या लक्षात येते. तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. अशा वेळी हुमणी अळीचे नियंत्रण करणे अतिशय अवघड होते. म्हणून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याआधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे असे नवले म्हणाले.