Breaking News

पारनेर तालुक्यातील निळोबाराय देवस्थानात दोन दिंड्या काढण्यावरून वाद


पारनेर / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानात दोन दिंड्या काढण्यावरून वाद रंगला आहे. सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातुन श्री क्षेत्र पिंपळनेर येथुन आषाढ वारीला दिंड्या जात असतात, मात्र या वर्षी दोन दिंडी सोहळ्यांना देवस्थान ट्रस्टने यंदा विरोध केला असून, बेकायदेशीर निघणार्‍या दिंडीवर जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. 
देवस्थानच्या वतीने सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्यात एकत्र सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील पाचवे संत म्हणून ओळख असलेले संत निळोबाराय यांची श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे समाधी आहे. तेथे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मागील दहा वर्षांत ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने येथील विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करून हा परिसर सुशोभीत व सर्व सुविधायुक्त केला आहे. गेल्या वर्षापासून संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दिंडी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर श्रीक्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबारायांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आले. मात्र, देव स्थानबरोबर येथील सोपानराव औटी यांनी संत निळोबारायांचा वेगळा दिंडी सोहळा सुरू केला. एकाच ठिकाणाहून वेगवेगळे दोन दिंडी सोहळे नकोत, यावर अनेकदा विचारमंथन झाले. वेगळी दिंडी न काढता देवस्थानच्या सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन व विनंती सोपानराव औटी ट्रस्टने केली. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. यंदाही त्यांनी दिंडी सोहळ्याची तयारी सुरू केल्याने देवस्थान व स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला.

श्री क्षेत्र पिंपळनेर येथून दोन दिंड्या काढण्यास आमचा विरोध आहे. येथून सालाबादप्रमाणे एकच दिंडी आम्ही काढणार असून दुसरी दिंडी काढणार्‍या सोपानराव औटी यांनी वेगळी दिंडी सोहळा सुरु करुन वाद, तिढा निर्माण केला आहे. त्यांचा देवस्थान ट्रस्टशी कुठलाही संबध नाही. तसेच ते पिंपळनेरचे रहिवाशी नाहीत. त्यामुळे ते विनाकारण वाद निर्माण करत आहे. याला ग्रामस्तांचा विरोध आहे. तसेच पिंपळनेर येथुन एकच दिंडी सोहळा निघेल. त्या दिंडीत सोपान औटी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करत आहोत. 
अशोक सावंत (कार्याध्यक्ष) 
संत श्री निळोबाराय देवस्थान ट्रस्ट