Breaking News

पाकच्या गोळीबारात चार जवान शहीद


श्रीनगर : रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा भारत आणि पाकिस्तानने निर्णय घेतलेला असतानाही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. बुधवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू- काश्मीरच्या सांबा सेक्टरच्या चमलियाल पोस्टच्या सीमेवर पाकने केलेल्या गोळीबारात एका असिस्टंट कमांडंटसहीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले. बुधवारी सकाळी पाकिस्तानने भारत-पाक सीमेवर गोळीबार केला. त्यात पाच सुरक्षा रक्षक जखमी झाले. तर असिस्टंट कमांडंट जितेंद्र सिंह, सहपोलीस निरीक्षक रजनीश, एएसआय रामनिवास आणि शिपाई हंसराज आदी शहीद झाले, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस.पी. वैद्य यांनी दिली. दरम्यान, गेल्या शनिवारीही पाकिस्तानकडून अखनूरच्या परगवाल सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला होता. त्यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते. याआधी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलीटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादी कारवायांवर चर्चा केली होती. दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही, असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले होते.