Breaking News

पाणी गळतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष


शेवगाव / प्रतिनिधी

शहरात आठ ते दहा दिवसाला पाणी येते. मात्र पाणी गळतीमुळे शहरवासियांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. 

एकीकडे ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ या आशयाच्या जाहिरातींवर नगरपालिका लाखो रुपये खर्च करते. मात्र शेवगाव शहरात अगदीच या उलट चित्र आहे. येथील गजबजलेली पेठ, शिवाजी चौक ते अर्बन बँक, नाईकवाडी मोहल्ला याठिकाणी या पाणी गळतीमुळे सतत रस्त्यावर पाणी साचत असते. त्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र या पाण्यामुळे कायम बाचाबाची होते. शहरांमधील पंचायत समिती रोड, वडारगल्ली, भारदे हायस्कूलमागील बाजू, जुना प्रेस परिसर, अहिल्याबाई होळकर चौक, धनगर गल्ली आदी ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे. नळाला पाणी आल्यावर हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जाते. जनतेला वेळेवर पाणीपट्टी भरूनही पाणी पुरेसे व वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनदेखील नगरसेवक व नगरपालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. शहरातील पंचायत समिती समोरील पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या पाइपला ठिकठिकाणी छिद्र पडले आहेत. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शहरातील नागरिकांना मात्र पाणी विकत घ्यावे लागते. नगरपरिषदेने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिक करत आहेत.