Breaking News

पावसाअभावी कपाशी लागवड रखडली


भाविनिमगाव प्रतिनिधी - वादळी वार्‍यासह अनेक ठिकाणी रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस झाला परंतु पहिला पाऊस उष्णतेत वहीला. वादळी वार्‍यासह अपवाद वगळता कोठेच चांगला पाऊस झाला नसुन खरीप पिके लागवडीसाठी शेतकरी वर्ग चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मृग नक्षत्रात सुरवातीला चांगला पाऊस झाला तर कपाशी बरोबर खरीप पिके लागवड मोठ्या प्रमाणात होते. व पिक जोमदार येते. यंदा मात्र चांगल्या पावसाचा अंदाज चुकल्या सारखे वाटत असुन पावसाळ्यात पुढील काही दिवस खंड पडणार अशा बातम्यांमुळे व दोन दिवसापासून सुटलेले वारे यामुळे पाऊस लांबणार अशी चिन्हे दिसत असल्याने खरीप पेरणीही लांबणार असे दिसते. रान मशागतीचे कामे जोरात सुरू असून बागायती परीसरात मात्र उपलब्ध पाण्यावर कपाशी लागवड सुरू असून शेतकरी ठरावीक वाणालाच पसंती देत असल्याचे कृषी केंद्र चालक यांच्या माहिती वरून समजते. बाजरी, मुग, कपाशी, तुर, सोयाबीन, मका आदी खरीप बियाणे पेरणीसाठी कृषी केंद्रात उपलब्ध झाले आहेत. मात्र पावसा अभावी शेतकरी बियाणे खरेदीच्या मनस्थितीत नसुन सद्य परिस्थितीत फक्त कपाशी लागवड थोड्या क्षेत्रावर सुरू असून उष्णतेचा उगवण क्षमतेवर परीणाम होत आहे. चारा पिकाचीही लागवड रखडली आहे. उभ्या ऊस पिकाला पाणी देण्याचा उद्योग शेतकरी करत असुन दोन दिवसांपासून सुटलेल्या सोसाटयाच्या वार्‍यामुळे कपाशी लागवड रखडली असुन मृग नक्षत्रात पिकाचा पेरा होईल की नाही या चिंतेतला शेतकरी वर्ग मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.