Breaking News

अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौडबंगालः भाग 10 - अर्बन बँकेला घोटाळ्यांच्या चक्रव्युहामुळे दिवाळखोरीचा फास


मिरजगाव दुधसंघ, अहमदनगरच्या फार्म हाऊस वर कसा केला कब्जा
अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी
नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप बँकेत घोटाळ्यांचे चक्र सुरू असल्याचे निदर्शनास आले असून लोकमंथनने नऊ दिवसांपासून बँकेत सुरू असलेल्या गांधीगिरीचे गौडबंगाल चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर घोटाळ्याचे बळी ठरत असलेले सभासद पुरावे घेऊन पुढे येऊ लागले आहेत. एका घोटाळ्याने पडलेला आर्थिक खड्डा बुज विण्यासाठी दुसरा घोटाळा करण्याची नव्याने पाडलेली प्रथा बँकेच्या अस्तित्वाभोवती दिवाळखोरीचा फास आवळू लागली आहे.--- लीड
एके काळी अहमदनगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेने नामोल्लेख होत असलेल्या नगर अर्बन को ऑप बँकेचे नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप बँक म्हणून बारसे झाल्यानंतर प्रतिष्ठा धुळीस तर मिळालीच पण या बँकेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नात सांगण्यातही शरम वाटत असल्याची भावना जुने जाणते सभासद व्यक्त करीत आहेत.
नगर अर्बन बँक गेल्या आठ वर्षात प्रगतीपथावर जाण्याऐवजी घोटाळ्यांच्या चक्रव्युहात अडविण्याचा नतद्रष्टपणा सुरू असल्याने बँकेसोबत सभासदांवरही नामुष्की ओढवली असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
ठेच लागल्यानंतर कुठलाही शहाणा माणूस पुढचे पाऊल टाकतांना खबरदारी घेतो. बँकेचा कारभार मात्र शहाणपणा दाखवून करण्याऐवजी शहाजोगपणा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने अनेकदा ठेच लागूनही कारभारी सुधारणा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.
पहिला घोटाळा जाणीवपुर्वक झाला किंवा अनावधानाने झाला असला तरी त्यातून मार्ग काढून झालेली चुक सुधारण्याऐवजी पहिल्या घोटाळ्यामुळे बँकेचे आर्थिक नुक सान भरून काढण्यासाठी योग्य त्या सनदशीर मार्गाचा वापर करण्याऐवजी दुसरा घोटाळा करण्यात ही कारभारी हशील मानीत आहे. नव्हे या बँकेत या क्षणापर्यंत हीच परंपरा सुरू असल्याने बँकेच्या भागभांडवलाला घोटाळ्यांच्या गोचड्यांनी कुरतडण्यास सुरूवात केली आहे.
काल म्हटल्यांप्रमाणे चेअरमनचा मुलगा आणि पत्नी यांच्या खात्यात आवश्यक तेवढी रक्कम शिल्लक नसताना लाखो रूपयांचे त्यांच्या खात्यावरील धनादेश वटविण्याची गांधीगिरी केवळ या आणि याच बँकेत दाखविली जात आहे.हा गाळा कसा भरून काढला जातो? या सरळ मनाला पडणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर या कुट बुध्दीवाद्यांकडे आहे. बँकेच्या भागभांडवलावर स्वतःचे उद्योग माजविणार्‍या या सफेदपोशखोरांनी आर्थिक कुवत नसलेल्या गरजवंत कर्जदारांचा शोध घेतला.त्यात आप्त आणि परके असे वर्गीकरण करण कमी उपद्रवमुल्य असलेल्या आधीच दिवाळखोरीत गेलेल्या कर्जदारांना कर्ज मंजूर करायचे, या मंजूर कर्ज खात्यातून विशिष्ट रक्कम बँक कारभार्‍यांची मुले आणि पत्नीच्या नावावर वर्ग करायची. आधीच दिवाळखोरी, त्यात कर्ज मंजूर करतांना आवश्यक त्या अटी शर्तींना फाटा दिलेला आणि यासाठी विशिष्ट रक्कम दिलेली, अशा कर्जाची फेड झाली तर आश्‍चर्य. अशा प्रकारचे कर्जखाते एनपीएत जाणार हे ठरलेले. मग पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ द्यायचा, सोयीस्कर हिशेब क रून कारभार्‍यांचा वाटा बाजूला काढायचा. बँकेला दिवाळखोरीकडे नेणारी अशी मोडस आपरेंडी सध्या सुरू आहे.
ही मोडस आपरेंडी वापरून मिरजगांव येथील थकबाकीत असलेला दूध संघ स्वपरिवाराच्या मालकीचा कसा करून घेतला किंवा अहमदनगर शहराजवळील एक अ लिशान फार्म हाऊस कवडीमोल किंमतीत घेण्याचा इतिहास फार जुना नाही.हुशारीने तांत्रिक बाबींची खबरदारी घेतली असली तरी वास्तव सभासदांपासून लपून राहिलेले नाही. 
श्रीगोंदा येथील दूध व्यवसायाशी संबंधित कोट्यावधीचे कर्जप्रकरण असो किंवा अहमदनगरमधील संगणक व्यवसायाशी संबंधित कार्यकर्त्याच्या नावावरील कोट्यावधीचे कर्ज व या दोन्ही कर्जप्रकरणांना देण्यात आलेली करोडो रुपयांची बेकायदेशीर व मनमानी ओव्हरड्राफ्टची सुविधा असो या सर्व व्यवहारांची सखोल तपासणी झाली तर यांची अंतर्गत संबधाची पोलखोल होवून मोठा व धक्कादायक गैरव्यवहार बाहेर येईल. व्यंकटेश व सम्यक या नावाची कर्जप्रकरणे तर बँकींग नियमांची चिंधड्या उड विणारी आहेत. जालना शाखा तर केवळ एकाच व्यापारी घराणेसाठी नियमबाह्य कर्जप्रकरणे करणेसाठीच चालविले जाते असे म्हणण्यास पुष्कळ वाव व पुरावा आहे. (क्रमशः)