Breaking News

खाकीच्या बाजारात हप्त्यांची बोली,एसीबीच्या सापळ्यातही "काय द्या" ची वसुली,शिर्डी पोलीस ठाण्यावर मेहेरबान आयजी,एसपींच्या कर्तव्यदक्ष घशात अडकले मुग

अहमदनगर /विशेष प्रतिनिधी
श्रध्दा सबूरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या शिर्डीत हैदोस घातलेल्या अवैध व्यवसायाला कायद्याचे रक्षक असलेल्या खाकी शिलेदारांकडून मिळत असलेल्या धुनीमुळे कायदा सुवस्थेच्या यज्ञातून असंतोषाचा धुर निघत आहे.मटका,दारू,गुटखा,रेती अशा बेकायदेशीर धंद्यांसोबत विविध गुन्ह्यांखाली एखाद्या संशयीतांकडून अटक टाळण्यासाठी मुद्देमालाच्या किंमतीपेक्षा दुप्प तिप्पट लाच मागण्याचा निर्लज्जपणा खाकीच्या शिलेदारांकडून सुरू आहे.विशेष म्हणजे शिर्डी पोलीस ठाण्याच्या या पापात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील काही कर्तव्य तत्पर अधिकारीही सामिल झाल्याने या पोलीस ठाण्याला सुगीचे दिवस आले असून कायदा सुव्यवस्था फाट्यावर मारली जात आहे.नव्याने नियुक्त झालेले नाशिक परिक्षेञाचे विशेष पोलीस महानिरिक्षक डाॕ.छेरींग दोरजे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या कार्यकाळात शिर्डी पोलीसांचा पारदर्शक कारभार चर्चेत येऊनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघाचे मुख्यालय असलेल्या,जगाला श्रध्दा आणि सबुरीचा संदेश देणार्या साईबाबांच्या शिर्डीत कायदा सुव्यवस्थेला अवैध धंद्यांच्या बाजारात मांडण्याचे पाप पोलीस खात्याच्या नावावर लिहीले जात आहे.सद्य परिस्थितीत शिर्डी पोलीसांच्या हप्तेखोरीने टोक गाठले असून बाबांच्या दर्शनाला येणार्या भाविक भक्तांना या हप्तेखोरीचा फटका बसत आहे.
देशी दारूची अवैध विक्री,महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा ,रेती,मटका हे शिर्डी पोलीसांच्या बाह्य उत्पन्नाचे नियमित मार्ग असतांना एखाद्या गुन्ह्यात कुणा संशयीताला अटक न करण्यासाठी संशयीताच्या आप्ताकडून गुन्ह्यातील मुद्देमालाच्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट लाच मागण्याचा निर्लज्जपणा तपासी अंमलदार करू लागल्याने शिर्डी पोलीस ठाणे लिलावाचे केंद्र बनल्याचा संदेश पंचक्रोशीत पसरला आहे.
पोलीसांच्या लाचखोरीविरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार करूनही लाचखोरांना बेड्या लावल्या जात नसल्याने लतखोरांचे धाडस वाढले आहे.सापळा लावणारे पथकही लाखमोलाची तडजोड करण्यातच स्वारस्य मानत आहे.एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसीबीने लावलेला ट्रॕप यशस्वी झाला तर त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला सजा म्हणून नियंञण कक्षात पाठवले जाते असे पोलीस महासंचालकांचे परिपञक असतानाही विशेष पोलीस महानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक मुग घशात अडकावेत तसे अबोल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(क्रमशः)


*लोकमंथनच्या अजेंड्यावर शिर्डी पोलीस ठाणे*
*नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार दि.१६ जुलै रोजी कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या सापळ्यात शिर्डी पोलीस ठाण्याचे किती कर्मचारी अडकले?*
*लाचलुचपत विभागाच्या पथकाने कलम २७९ प्रमाणे कारवाई करून कुणावर मेहेरबानी केली? का?*
*पोलीस निरिक्षकांच्या मर्जीतील कुणाला कारवाईपासून दुर ठेवले? बोली किती लागली?*
*एकाच पोलीस कर्मचार्याला बळीचा बकरा बनवून अन्य सह संशयीतांवर दया दाखवण्याचा ट्रॕप धार्यांचा हेतू काय?*
*पोलीस निरिक्षकांनाही का करावी लागली सरबराई*
*शिर्डीच्या हद्दीत रेतीची अवैध वाहतूक ,देशी दारूची अवैध विक्री, गुटखा मटक्याचे ठेले आशा बेकायदेशीर धंद्यांवर वसूली करणार्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा जमा खर्चासह शिर्डी पोलीस ठाणे आणि एलसीबीचे स्नेहबंध...*