Breaking News

घटनेचा वेध घेण्यासाठी भगवद् गितेचा बाण

सन २०१४ नंतर याशाच्या राज्य घटनेची चिरफाड केली जात असल्याचा संशय नव्हे भिती व्यक्त केली जात आहे.केंद्रात मिळालेल्या अनपेक्षित बहुमतानंतर दोन चार राज्यांचा अपवाद वगळला तर सर्वदूर हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात सत्तेचा रिमोट असल्याने देश आणि राज्य पातळीवर घेतल्या जात असलेल्या निर्णयांमुळे या भितीला आणखी घाबरविण्याचे संकेत मिळत आहेत.सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला भगवद गितेचा मुद्दा हा देखील त्याचाच एक भाग आहे.मुळात राज्य घटनेतील कलम २८ धार्मिक शिक्षण शाळा आणि महाविद्यालयांमधून देण्यास परवानगी देत नाही .तरीही भगवद् गितेचा प्रचार आणि प्रसार करणारे परिपञक काढले जात असेल तर घटनेची मोडतोड करण्याबाबत व्यक्त केली जात असलेली भिती रास्तच म्हणावी लागेल.

महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिक्षण मंञालयाचा कारभार विनोद तावडे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला तेंव्हा पासून संतांची भुमी असलेल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे विद्रूपीकरण सुरू झाल्याचे चिञ आहे.नावाप्रमाणेच तावडे यांनी शिक्षणाचा विनोद करून कुचेष्टा सुरू ठेवली आहे.शिक्षणमंञी म्हणून विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या काना कोपर्यापर्यंत तळागाळातील शेवटच्या घटकाला शिक्षण सहज सुलभ आणि परवडेल अशा पध्दतीने उपलब्ध करून देण्यासाठी उचललेले एखादे पाऊल टाकले असे एकही उदाहरण नाही.शिक्षण व्यवस्थेचे कंबरडे मोडणारे भांडवलशाहीला शैक्षणिक क्षेञात पायघड्या टाकण्याकडे त्यांचा कल राहीला आहे.एकूणच मुळ व्यवस्थेला छेद देण्याची संघी मानसिकता तावडे यांच्या निर्णयातून प्रत्येक वेळी प्रतिध्वनीत झाली आहे.
काल परवापासून एक नवा वाद सुरू झाला आहे.महाविद्यालयांमध्ये भगवद् गितेचे वितरण करण्याच्या शासकीय भुमिकेवरून या वादाला तोंड फुटले.भगवद् गिता चांगली की वाईट हा मुद्दाच मुळात चर्चेचा होऊ शकत नाही कारण भगवद् गितेतून जीवनाचे खरे तत्वज्ञान शिकवले जाते यावर जगभरातील अभ्यासकांनी शिक्कामोर्तब केले आहे.म्हणून महाविद्यालयांमधून गितेचे वितरण करण्यास विरोध करणार्या विरोधकांना तावडे यांनी विचारलेला प्रश्न निरर्थक आहे.विरोधकांनी गिता वाईट आहे असे कधीच म्हटले नाही.प्रश्न गिता वितरण करण्यामागे असलेल्या सुप्त हेतूचा आहे.गितेचा प्रचार करणारी मंडळी एरवीही शहरांशहरांमधून गिता वितरीत करीत असतात,त्याला कधीही कुणीही आक्षेप नोंदविल्याचे उदाहरण नाही.माञ शिक्षणासारख्या पविञ क्षेञात आणि भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात कुठल्याही एका धर्माचे शिक्षण देण्याची परवानगी आपली राज्यघटना देत नाही.घटनेच्या २८ व्या कलमात तसे स्पष्ट निर्देश आहेत.हे कलम देशातील सर्व शाळा, महाविद्यालये धार्मिक शिक्षणापासून अलिप्त ठेवते. जर शाळेत धार्मिक शिक्षण दिल्या जात असेल तर घटनेचा तो अवमान ठरतो. ज्या शाळेची मान्यता फक्त धार्मिक शिक्षणासाठी आहे.अशाच शाळांना धार्मिक शिक्षण देता येते. बाकी निमसरकारी,सरकारी, कार्पोरेशन,जिल्हा परिषद अशा कोणत्याही शाळेत कोणत्याही धर्माचे स्त्रोत,पुजन किंवा मंत्र म्हणण्याची अनुमती नाही. योगायोगाने या देशात बऱ्याच शाळा हिंदू धर्मीय असल्यामुळे अशा शाळेत सरस्वती स्त्रवण, ब्राम्हणी संस्कार खुले आम होत असतात. पालकांच्या परवानगिशिवाय कोणत्याही मुलाला धार्मिक शिक्षण देता येत नाही.भगवद् गिताच काय बायबल आणि कुराणही सांगता येणार नाही.एव्हढे स्पष्ट घटनेत नमूद असतांना भगवद् गितेचा हट्ट पुरवून घेण्यासाठी विनोदा तावडे यांच्या सारखा शिक्षण मंञी सभागेहाच्या पटलावरून विरोधकांना बायबल कुराण वाटण्याचै आव्हान करतो,यापेक्षा लोकशाही आणि त्या राज्य घटनेचे दुर्दैव काय असू शकते?
स्मृती इराणी केंद्रीय शिक्षण मंञी असताना अशाच प्रकारे शिक्षणाचे भगवीकरण होत असल्याचे आरोप झाले आहेत.विनोद तावडेही त्याच मार्गावर आहेत असे म्हणण्यास पुर्ण वाव आहे.धार्मिक शिक्षण देणार्या सार्वजनिक आणि खासगी क्षेञातील शिक्षण संस्थांची (धार्मिक शिक्षण संथांचा अपवाद) मान्यता रद्द करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.या अधिकाराचा वापर करणार्या शिक्षण मंञ्यांची भुमिका संदिग्ध असेल तर घटनेची बुज कशी राखली जाईल.एकूणच तावडे यांच्या या भुमिकेमागे आरएसएसी हेतू आहे,आणि भगवद् गितेच्या नथीतून बाण मारून घटनेचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे,हेच खरे.