Breaking News

मल्टीप्लेक्समध्ये नेता येणार बाहेरचे खाद्यपदार्थ राज्य सरकारची विधानपरिषदेत माहिती


मुंबई : राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आता घेऊन जाता येणार आहेत. यासाठी सरकारकडून कुठलीही बंदी नाही. जर अशी बंदी कोणी करत असेल, तर त्यावर कारवाई केली जाईल, आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गृह विभाग सहा आठवड्यांच्या आत धोरण ठरविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीत अनेक प्रश्‍न उपस्थित केले होते. 
यात त्याचबरोबर मल्टीप्लेक्स, मॉलमधील पाण्याची बॉटल असेल किंवा अन्य खाद्यपदार्थ यांच्या दरातील असलेल्या तफावतीसंदर्भात केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे 1 ऑगस्ट पासुन एकाच वस्तुची एमआरपी वेगवेगळी राहणार नसल्याचेही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या लक्षवेधीत संजय दत्त, अनिल भोसले,डॉ.निलम गोर्‍हे, प्रविण दरेकर यांनीही उपप्रश्‍न विचारले. या लक्षवेधीमुळे यापुढे आता प्रेक्षकांना मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहेत. तसेच 1 ऑगस्ट पासुन खाद्यपदार्थांचे एकच एमआरपी राहणार असल्याने मल्टीप्लेक्स मध्येही त्याच किंमतीत वस्तु मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.