Breaking News

शेवगाव नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी तिजोरे व मोहिते यांच्यात होणार लढत


शेवगाव प्रतिनिधी -  नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विजयमाला तिजोरे व राणी मोहिते या दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल झाले. छाननीमध्ये हे तिन्ही अर्ज वैध ठरल्याने राष्ट्रवादीच्या तिजोरे व भाजपच्या मोहिते यांच्यात सरळ सामना होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 
येत्या 1 ऑगस्टला ही निवडणुक होणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष विद्या लांडे यांच्या कारकिर्दीला अडीच वर्ष पूर्ण झाल्याने ही निवडणूक होत आहे.  नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला असून राष्ट्रवादीकडून विजयमाला तिजोरे यांनी एक तर भाजपकडून राणी मोहिते यांनी दोन उमेदवारी अर्ज
पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्याकडे दाखल केले. हे तिन्ही अर्ज छाननीत वैध ठरल्याने तिजोरे व मोहिते यांच्यातच लढत होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. पालिकेत सध्या अपक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीची सत्ता असून 1 ऑगस्टला नगराध्यपदाच्या निवडी बरोबरच उपाध्यक्ष पदाची
सुद्धा निवडणूक होणार असल्याने सध्या राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत हि सत्ता आपल्या कडेच राहावी असा प्रयत्न सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी एकीकडे चालविला असताना दुसरीकडे आमदार मोनिका राजळे या सुद्धा पालिका आपल्याकडे घेण्यासाठी अनेक अपक्ष नगरसेवकांशी संधान साधून असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.