Breaking News

पीडीपीत फूट पाडल्यास गंभीर परिणाम मेहबुबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला इशारा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये 3 वर्षे एकत्र काम केल्यानंतर आता पीडीपी-भाजपमधून विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. भाजपने पीडीपीमध्ये फोडाफोडी केली तर काश्मीरमध्ये सलाउद्दीनसारखे अनेक दहशतवादी जन्माला येतील आणि परिस्थिती 90 च्या दशकासारखी होईल. मुफ्ती यांनी भाजप आणि केंद्र सरकारला 1987 ची आठवण करुन दिली. ‘जर दिल्ली सरकारने 1987 प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती फार गंभीर होईल’. यातून सलाहुद्दीन आणखी यासिन मलिकसारखे दहशतवादी जन्माला येतील, असे मुफ्ती म्हणाल्या. 2015 मध्ये पीडीपीने भाजपबरोबर सरकार स्थापन केले. मात्र भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.