Breaking News

… तरच गावच्या शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात : औताडे

कोपरगाव श. प्रतिनिधी:
दुष्काळ निवारण आणि गावचा समृध्द शाश्वत विकास करण्यासाठी वृक्ष लागवडीच प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे तितकेच गरजेचे आहे.  वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगितले. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्विकारली तरच गावाचे  चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे प्रतिपादन सरपंच अमोल औताडे यांनी केले.
तालुक्यातील पोहेगांव येथे शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड या मोहिमेअंतर्गत व शिवसेना नेते नितीनराव औताडे यांचे मार्गदर्शनाखाली घेतलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संरक्षक जाळी लावण्याच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर गांगुर्डे, निखिल औताडे, रामनाथ भालेराव, पल्लवी लोखंडे, अलका जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. एम. काळे, सुनिल लोखंडे, गणेश औताडे, वसंत औताडे, गौरव औताडे, पोपट शेळके, सुनिल रोहमारे, अनिकेत औताडे, एकनाथ औताडे, निलेश औताडे, बाळासाहेब आहेर, सतिश घुसळे, सौरभ पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नितीन औताडे, राहुल  औताडे, अमोल औताडे, बाळासाहेब शिंदे यांनी मोफत ट्री गार्ड (लोखंडी जाळीचे कुंपण) तसेच ग्रीन इंडिया इरिगेशन कंपनीच्यावतीने औताडे यांनी मोफत ठिबक सिंचन संच भेट दिले. सूत्रसंचालन ग्रामसेवक रामदास काळे यांनी केले. उपसरपंच प्रशांत रोहमारे यांनी आभार मानले.