Breaking News

लोणीमध्ये धाडसी घरफोडी ; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास


कोल्हार प्रतिनिधी :

राहाता तालुक्यातील लोणी येथे चोरटयांनी केलेल्या धाडसी घरफोडीत १२ तोळे सोने, २२ किलो चांदी आणि ४० हजार रुपये सारा तब्बल ३ लाख पन्नास हजारांचा ऐवज चोरीला गेला. चोरटयांनी येथील बाळासाहेब जाधव यांच्या बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अन्य वस्तूंची उचकापाचकदेखील केली.

संगमनेर येथील युटेक साखर कारखान्याचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जाधव हे लोणी येथील पी. एम. टी. हॉस्पिटलजवळ राजहंस कॉलनीलगत वास्तव्यास आहेत. पुणे येथे असलेल्या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी जाधव दांपत्य गेले होते. त्या दरम्यान ही घटना घडली. यामध्ये एक तोळ्यांचे लॉकेट, साडेचार तोळ्यांचे गंठण, सुमारे साडेतीन तोळ्यांच्या अंगठ्या, दिड तोळ्यांचे कर्णफुले, मनचली, पदक असे सुमारे १२ तोळे सोने व २२ तोळे चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे. 

लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले. या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.