Breaking News

मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरूच ; दोन दिवसांत होणार आत्मदहन

सोनई प्रतिनिधी
प्रवरासंगम येथे नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या स्व. काकासाहेब शिंदे यांच्या निधनानंतर सोनईत दि. २४ रोजी १०० टक्के बंद पाळण्यात आला होता. यावेळी येथील शिवाजी चौकात असलेल्या तलाठी कार्यालयासमोरील शिवाजी पुतळ्याजवळ युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले. सलग पाचव्या दिवशीही सुरुच  आहे. नायब तहसिलदारांव्यतिरिक्त दुसरे कोणीही या आंदोलनाकडे फिरकले नाही. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत आत्मदहन करण्याचा इशारा या युवा कार्यकर्त्यांनी ‘दैनिक लोकमंथन’शी बोलताना दिला.
दरम्यान, या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम, आरपीआय, नाथपंथी डबरी गोसावी आणि इतर विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दरंदले आदींनी आज [दि. २८] या संतप्त युवा कार्यकर्त्यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी मराठा समाजातील या तरुण युवक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची अशी मागणी केली. जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मेगा भरतीला स्थगिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. या ठिय्या आंदोलनात सर्व जातीधर्माचे युवक सहभागी झाले आहेत. सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनाबाबत मंडल अधिकारी गावडे, कामगार तलाठी वायभासे, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  किरण शिंदे यांनी फक्त पाहणी केली. परंतु प्रशासकीय पातळीवर काहीही चर्चा न झाल्याने हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
… आंदोलन तीव्र केले जाईल
मराठा आंदोलनात केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचे निमित्त करून चालढकल केली जात आहे. राज्यपातळीवर बैठकांचा फार्स सुरु आहे. त्यामुळे राज्यशासनाचविषयी तरुणाई भडकलेली आहे. सरकारला काही काळजी नसेल तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
अमोल चव्हाण, सोनई.