Breaking News

आठ आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न मराठा आंदोलनाची धग कायम ; नांदेडमध्ये एसटी बस पेटवली

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी औसा तहसील कार्यालयात 7 ते 8 आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक आणि सुरक्षाबळ कमी असल्याने पोलिसांची पुरती दमछाक झाली. राज्यभरात मराठा समाज बांधवाकडून महानगर, जिल्ह्याचे ठिकाण, तालुके आणि गाव पातळीवर देखील आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणी देखील तालुक्यातून आलेल्या जवळपास 100 च्या घरात असलेल्या मराठा समाजातील तरुणांनी तहसील कार्यालय गाठले. घोषणाबाजी देत चक्क या 7 ते 8 आंदोलनकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखत पोलिसांनी आत्मदहन करणार्‍या तरुणांना ताब्यात घेतले. मात्र, औसा तहसील कार्यालय आवारात आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक आणि पोलीस बंदोबस्त तोकडा पडला. आंदोलन मोडून काढताना आणि आंदोलनकर्त्यांना आत्मदहनापासून परावृत्त करताना पोलिसांची पुरती दमछाक उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, यावेळी आंदोलक मराठा समाज बांधवांनी औसा तहसील कार्यालयाच्या पायर्‍यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तहसील कार्यालयात कामकाजासाठी येणार्‍या आणि कार्यालयातून बाहेर जाणार्‍या नागरिकांना आडवून ठेवले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत तहसील कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन करणार्‍या आंदोलकांना बाजूला करीत तहसीलचे कामकाज पूर्ववत केले. या प्रकरणी औसा पोलिसात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आंदोलनकर्ते सर्वात जास्त राज्य परिवहन मंडळाच्या एसटीला लक्ष्य करत आहेत. मंगळवारी सकाळी उमरी तालुक्यात एसटी बसची तोडफोड करण्यात आली, तर दुसर्‍या एका घटनेत एसटी बस पेटवून देण्यात आली. जिल्ह्यातील नरसी-मुखेड रोडवरील अलूवडगावाजवळ मराठा समाजाच्या शेकडो आंदोलकांनी घोषणा देत मुखेड आगाराची बस पेटवून दिली. या आगीत एसटी बस जळून खाक झाली आहे. घटनास्थळी धाव घेत मुखेड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ मुखेड-नरसी रोडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूची वाहतूकही ठप्प झाली होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.