Breaking News

राज्यातील शिक्षक व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी) 
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील शासकीय अनुदानित, खाजगी संस्थानच्या शाळांमधील शिक्षक व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिक्षक परिषदेच्या वतीने नुकतेच निवेदन दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील शासकीय, अनुदानित खाजगी संस्थांच्या सर्व शाळांमधील शिक्षक व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्यासाठी झालेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणाबाबतच्या सुनावणीचे कामकाज झाले असून, उर्वरित प्रशासकीय विभागाचे संबंधित कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबतची सुनावणी चे नियोजन पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑगस्ट 2018 अखेर सुनावणी संदर्भातील सर्व कामकाज पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर समितीने अहवाल तयार करणे, शासनास अहवाल सादर करणे, मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर करणे, शासन मान्यतेने अधिसूचना निर्गमित करणे यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तरी या प्रकरणात जातीने लक्ष घालून दिवाळीपूर्वी अक्टोबरमध्ये याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून सातवा वेतन आयोगाचा लाभ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना देण्याची मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.