जामखेडमध्ये रानडुकरांचा उद्रेकी वावर, ग्रामपंचायत सदस्यांसह दोन महिलांवर हल्ला


जामखेड / प्रतिनिधी । 
तालुक्यातील साकत येथे रानडुकरांच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. साकतसह जामखेड तालुक्यातील खर्डा, मोहरी, धामणगाव, तेलंगशी, मुंजेवाडी, नागोबाचीवाडी आदी परिसरामध्ये रानडुकरांचा मुक्त उद्रेकी वावर वाढलेला दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने ताबडतोब रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
साकत येथील ग्रामपंचायत सदस्या सोजरबाई भगवान वराट (वय 70) व त्यांची सून अश्‍विनी दादासाहेब वराट ( वय 35) या गावाजवळील शेतात काम करत असताना, अचानक एक रानडुक्कर सोजरबाई यांच्या जवळ आले. त्यांना जोराची धडक दिली. यामुळे त्यांचा खुबा व मांडीचे हाड मोडले. त्या जमिनीवर कोसळल्या. यावेळी त्या ओरडल्या म्हणून अश्‍विनी वराट त्यांच्याकडे येत असताना, त्यांनाही धडक देवून खाली पाडले. यावेळी शेजारी धावत आले. सोजरबाई यांना कसलीच हालचाल करता येत नसल्याने लोकांनी त्यांना झोळी करून गावात आणले. ताबडतोब वाहनाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी एक्सरे काढला असता मांडी व खुबा हे मोडल्याचे सांगितले व यावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले त्यानुसार आज शस्त्रक्रिया करण्यात आली.
दहा ते पंधरा रानडुक्करांचा एक-एक कळप आहे. एखाद्याच्या शेतात हे घुसले तर, संपूर्ण पिकांचा निकाल लावतात एखादा शेतकरी त्यांना हुसकावून लावण्यासाठी गेला तर त्यावर ते हल्ला करतात. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या डुकरांना मारण्याचा परवाना मिळावा व शेतकर्‍यांना डुकरे मारण्यासाठी शस्त्रे मिळणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.
या दोघींना जखमी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. जंगलाला कंपाऊंड करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जखमींना वैद्यकीय खर्च मिळावा असे दादासाहेब वराट यांनी सांगितले.
सध्या घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. कशीबशी पेरणी झाली आहे. कधीतरी येणार्‍या रिमझिम पावसाने पीके बरी आहेत. मात्र रानडुक्करे पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. दिवसभर जंगलात राहतात व रात्री किंवा दिवसाही शेतात येऊन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. याबाबत वनविभागाला कळवले असता, वनविभाग पंचनामा फोटो काढून, वरीष्ठ कार्यालयात पाठवितात. यातून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असते. तीदेखील वर्षे-वर्षे मिळत नाही. आता तर माणसावर हल्ले सुरू केल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले.
सोजरबाई यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांच्यामांडी व खुबा यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येईल असे सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारे रानडुक्करांनी मोहरी येथील उत्तम सोनवणे या शेतकर्‍यावर हल्ला केला होता.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget