Breaking News

नाणारची अधिसूचना रद्द करा : विरोधकांची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाणार बाबतच्या निवेदनानंतरही शिवसेनेसह विरोधकांचे समाधान झाले नाही. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात लावून धरली. त्यामुळे विधानसभेत प्रचंड गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारच्या प्रकल्पाबाबत आग्रही भूमिका घेतल्याने विरोधक संतापले. नाणारचा प्रकल्प कोणत्याही चर्चेविना रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी नाणार जमीन अधिग्रहित करण्याची 31-1 ची अधिसूचना आधी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर संताप व्यक्त केला. ‘मुख्यमंत्री सर्वांना विश्‍वासात घेऊ असे म्हणतात, मग कुणालाही न कळत केंद्रात सौदी अरेबियाच्या कंपन्यांशी करार कसे केले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे अनंत गीते केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत, त्यांना तरी कारभाराबाबत विश्‍वासात घेतले का ? अशी प्रश्‍नांची सरबत्तीही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.