Breaking News

आगीमुळे डाळिंब साहित्यासह स्कार्पिओचे नुकसान

प्रतिनिधी । राहाता
साकुरी-शिर्डी सरहद्दीवर नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका इमारतीखाली डाळिंब पँकिंगसाठीच्या कागदी भागाला आग लागली. वाऱ्यामुळे या आगीने मोठे रौद्र रूप धारण केले. त्यामुळे याठिकाणी उभी असलेली स्कार्पिओ आगीत जळाली. ही आग सदर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत भडकत गेली. या आगीत लाखो रूपयांचे डाळिंब साहित्य तसेच स्पेअर्सपार्टचे नुकसान झाले.
शनिवारी [दि. २९] दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. काही वेळातच आगीने रौद्र रूप घेतले. स्कार्पिओ पेटल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील दोन सदनिकांना ही आग लागली. त्यामधे ठेवलेल डाळिंबाचे हजारो कॅरेट व साहित्य जळून खाक झाले. तर दुसऱ्या सदनिकेमधील गाड्यांचे स्पेअर पार्ट आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जळून खाक झाले.  स्थानिक नागरिकांनी तातडीने शिर्डी नगरपंचायत व राहाता पालिकेला माहिती कळविली. दोन्ही गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले. स्कार्पिओ मात्र जळून खाक झाली.
या इमारतीच्या परिसरात  आंध्र प्रदेशातील डाळिंब व्यापारी डाळींब पॅकिंग करत आहेत. डाळिंबासाठी लागणारे कागदाची चार ते पाच टन रद्दी साठविलेली होती. इमारतीच्या खालील पाकिंगच्या जागेत तीन ते साडेतीन हजार कॅरेट ठेवलेले होते. सुरुवातीला पेपर रद्दीला आग लागली आणि त्यानंतर ती आग कॅरेटपर्यंत पोहोचली. दरम्यान जवळच उभी असलेली स्कॉर्पिओ आगीच्या भक्षस्थानी सापडली. या इमारतीलगत मोठी हॉटेलस् व विविध दुकाने होती. सुदैवाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.