Breaking News

लौकीच्या उपसरपंचपदी जयश्री भवर


कोपरगाव : तालुक्यातील लौकी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या जयश्री रामदास भवर यांची निवड झाली आहे. मागील एप्रिल महिन्यात झालेल्या येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी कोल्हे गटाचे चांगदेव इंगळे निवडून आले होते. सदस्य पदासाठी मात्र काळे गटाचे चार तर कोल्हे गटाचे तीन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सरपंच चांगदेव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी कोल्हे गटाकडून जयश्री भवर तर काळे गटाकडून बाळासाहेब भवर यांनी उमेदवारी दाखल केली. मुंबई व औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार सरपंचास मतदानाचा हक्क बजावता येत असल्याने दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. अशावेळी सरपंचास निर्णायक मत देण्याचा अधिकार खंडपिठाने दिलेला असल्याने त्यांनी आपले निर्णायक मत कोल्हे गटाच्या पारड्यात टाकले. त्यामुळे जयश्री भवर यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार शिवाजी सुरसे यांनी जाहीर केले.