Breaking News

आपल्या मृत्यूची डॉ. हाथींना लागली होती का चाहूल?


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉ. हाथी अर्थात कवी कुमार आझाद यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आझाद यांच्या आकस्मित मृत्यूमुळे संपूर्ण टीव्ही जगतात शोककळा पसरली. 'तारक मेहता का...' मालिकेने दिवसभराचे चित्रीकरण थांबवले होते. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांचे दोन ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यांचे हे ट्विट वाचून त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

कवी कुमार यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'नेहमीच आनंदी राहा. तुमचा आनंदच तुमचा खरा दागिना आहे... त्यामुळे नेहमीच आनंदी राहा.' त्यांच्या या ट्विटनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजून एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, कोणीतरी म्हटलंय की, कल हो ना हो... पण मी म्हणतो की, पल हो ना हो... प्रत्येक क्षण जगा. त्यांच्या या वाक्यांप्रमाणे ते जगायचेही.