Breaking News

आदिवासी दाम्पत्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन


श्रीगोंदा / प्रतिनिधी । 
तालुक्यातील काष्टी येथील मासेमारी हा पारंपारिक उद्योग करून आपली व कुटुंबाची उदरनिर्वाह करणार्‍या आदीवासी मोरे कुटुंबाला येथील, काही वाळूतस्कर गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत आहेत. त्याविषयी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि. 27 जून रोजी शिरूर तालुक्यातील तांदळी येथील सात ते आठ जणांनी अशोक मोरे यांच्या घरी जावून, त्यांच्या कुटुंबातील महिलांना व मुलाला बेदम मारहाण केली. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.र.नं.आय 297/2018 भा.दं.वि.कलम 143, 147, 148, 148, 334, 323, 504, 506, 509 नुसार संभाजी रावसाहेब पवार, मच्छिंद्र रावसाहेब पवार, शेखर सुभाष गोलवड, दत्ता भिवा हजारे, लखन गोरख शेजवळ, सतिष सुभाष गोलवड आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान यांच्यावर  काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर दि. 23 जुलै रोजी दत्तात्रय अशोक मोरे यास रस्त्यात, अडवुन मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद श्रीगोंदा पोलिसांत करण्यात आली. मात्र श्रीगोंदा पोलिसांनी सदर प्रकरणांची साधी चौकशी ही केलेली नसल्याचे, फिर्यादी मोरे व त्यांच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. यासाठी दि. 30 जुलै रोजी मोरेंना काल झालेल्या दमदाटी आणि दादागिरीच्या संदर्भांत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक म्हणाले की, तुम्हाला दुसरे काम नाही का ? आम्हाला काय तेवढंच काम आहे काय? त्यांना पकडायला जातोयत पण ते सापडत नाही. म्हणत, यांनाच दमबाजी केली असल्याचा मोरे यांनी आरोप केला आहे.
वास्तविक पाहता सदरील फिर्यादी व पीडित कुटूंब हे आदिवासी समाजाचे आहे. मात्र त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नसल्याचे एफआयआरवरून निदर्शनास येत आहे.
यापुर्वी काष्टी येथीलच एका कोळी समाजाच्या युवकाला त्याच्या सवर्ण समाजाच्या मित्राने किरकोळ मारहाण केली. तर, त्यांच्यावर लगेच अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांचा एकाला एक ! आणि एकाला एक असा वेगवेळगळा न्याय का? असा सवाल या प्रकरणाच्या अनुषंगाने उपस्थित होत आहे. या सर्व विषयातून असे स्पष्ट होते की, श्रीगोंदा पोलिस प्रशासन मनमानी पद्धतीने कायद्याचा वापर करीत आहे. सामान्यांच्या प्रकरणांत अदखलपात्र गुन्हे दाखल करणे, व काही पुढारी, काही नेते, काही जवळचे सामजिक कार्यकर्ते, काही जवळचे पत्रकार, यांच्या प्रकरणांत एकदम दखलपात्र गुन्हे त्यांच्या वतीने नोंदविले जातात हे वरील दोन विषयांनी स्पष्ट होत आहे.
यामुळे थेट जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथेच हे आदिवासी दाम्पत्य दलित आदिवासी संघटनांच्या माध्यमांतून श्रीगोंदा पोलिसांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याचे अशोक मोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.