Breaking News

मिरजगावात धाडसी घरफोडी; अंदाजे 16 लाखांची चोरी


मिरजगाव / प्रतिनिधी । 25
बर्‍याच दिवसांपासून येथे करकोळ चोर्‍यांचे प्रकार घडत आहेत. त्याकडे पोलिस प्रशासनासह ग्रामस्थांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यामुुळे मिरजगाव येथील डॉ. रमेश झरकर यांच्या राहत्या इमारतीमध्ये मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास जबरी चोरी झाली. मागील आठ दिवसांपुर्वी डॉ. झरकर हे सपत्नीक मुंबई येथे असलेल्या मुलीकडे गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते, याचाच फायदा चोरांनी घेतला.
पोलिस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार मिरजगाव येथील श्रीकृष्ण कॉलनीतील कालिका माता मंदिराच्या शेजारीच असणार्‍या डॉ. रमेश झरकर यांच्या राहत्या इमारतीचा मुख्य दरवाजाची कडी गॅसकटरच्या सहाय्याने तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व उचकापाचक करत, सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. तसेच घरातील लोखंडी कपाटही तोडून त्यामधील सामान खाली फेकून दिले. कपाटातील दागिने व कोटाची सोन्याची बटने असा अंदाजे सोळा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी झाल्याचे सांगितले असले तरी अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसल्याचे सांगितले आहे.
या चोरी तपासासाठी चक्रे जोरात फिरवली असून, तपासकामी अहमदनगर येथून श्‍वानपथक घटनास्थळी दाखल करण्यात आले होते. या श्‍वानपथकाने परीस्थितीची पाहणी करून मिरजगाव वरुन नागलवाडी कडे जाणार्‍या रस्त्यावरील वैकुंठभूमीपर्यंतच माग काढला. यापुढे चोर त्यांनी आणलेल्या वाहनातून पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत. पुढील तपासासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली असून, पथके रवाना झाल्याचे सहाय्यक फौजदार पालवे यांनी सांगितले. तसेच ठसे तज्ज्ञांनी कपाटावरील व सामानावरील ठसे मिळाली असुन, तपास कामी त्याचाही उपयोग होणार आहे. परंतु चोरीच्या घटनेस दोन दिवस झाले आहेत, तरी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी पंचनामा केला असुन, पुढील तपास कर्जत पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण करत आहेत.