Breaking News

तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा रंगली बालपणाच्या भावविश्‍वातील ‘दिल दोस्ती दुनियादारी’


श्रीरामपूर प्रतिनिधी- व्हॉट्सप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम ही माध्यमे मानली तर टाईमपास आणि चांगला उपयोग केला तर लाख मोलाची. याचीच प्रचिती श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीत शिकणार्‍या माजी विद्यार्थी व शिक्षकांना आली. 1996 साली दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहमेळावा ठरवला. सोशल मिडियाचा वापर करून सवंगड्यांना सांगावा पाठवला. त्यास प्रतिसाद देत सर्वांनी शांळेत धाव घेतली अन तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा रंगली बालपणाच्या भावविश्‍वातील ‘दिल दोस्ती दुनियादारी’.
येथील श्रीरामपूर एज्यूकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या विद्यालयातून 1996 साली दहावी सुटलेले विद्यार्थी आता पुणे, मुंबई, बेंगलोर आदी ठिकाणी स्थाईक झाले. मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या वर्ग मित्र, मैत्रिणींचा संपर्क झाला. व्हॉट्स पवर सर्व एकत्र आले. गप्पा रंगू लागल्या. पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. मग पुन्हा भेटून धमाल करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. आणखी सवंगड्यांचे क्रमांक मिळविले. त्यांनाही गृपमध्ये अ‍ॅड केले. सर्वांनुमते दिवस ठरला. स्थानिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. त्यावेळचे अनेक शिक्षक निवृत्त झालेले. काही शहराबाहेर तर काही शहरातच होते. त्यांचा पत्ता शोधला, संपर्क केला, आमंत्रण दिले. ठरल्यादिवशी सर्व एकत्र आले.
शाळेतच छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अरूण वेताळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयत समितीचे सदस्य बाळासाहेब ओझा, सोपान सानप, दिनकर पोखरकर, सत्वशील शहाणे, मंदाकिनी पिसोळकर, बेबीनंदा भिंगारदिवे, शिला पाटील, सुमन शहाणे, मुळे, स्मिता निर्मळ, सुनंदा खर्डे, शिरीष सुर्यवंशी, दिलीप जासूद, राजेंद्र धोंगडे, माधव गायक वाड, मनोज वैराळ, सत्यनाथ शेळके आदींसोबत सध्या कार्यरत असणार्‍या सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी यथोचित सन्मान केला. भावनिक शब्दात अनेकांनी आठवणी व्यक्त केल्या. शिक्षकांनीही आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थी आपल्या पुर्वीच्या बेंचवर वर्गात बसले. पुन्हा तोच धिंगाणा घालीत आठवणींना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्यावतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थितांचे स्वागत व्यंगचित्रकार रवी भागवत यांनी केले. तर प्रास्ताविक मानसी कुलकर्णी यांनी केले. यावेळी अभिजित रासकर, प्रशांत रंजनकर, संदीप ढवळे, बबन टिक्कल, अचर्ना मत्सागर, शितल शिंदे, शितल कुवर, सविता गरूटे आदींसह अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन विरेश लबडे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सचिन गायकवाड, किशोर फरगडे, श्रीकांत दहिमीवाळ, हरविंदर सिद्धू, अविनाश कुदळे, अशोक यादव, राहुल शहाणे आदींसह सर्व विद्यार्थी प्रयत्नशील होते.

चित्ररूपी ‘गुरूदक्षिणा’
तब्बल 22 वर्षांनंतर प्रथमच गुरूजणांना एकत्रित भेटण्याचा योग येणार असल्याने त्यांचा सन्मान करण्याचा सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी रवी भागवत यांनी काढलेले प्रत्येक शिक्षकांचे रेखाचित्र त्यांना भेट देण्यात आले. आपल्या रेखाचित्राच्या माध्यमातून मियालेली गुरूदक्षिणा पाहून गुरूजणांचा आनंद द्विगुनित झाला.