Breaking News

भोयरे गांगर्डा परिसरात उभ्या पिकामध्ये चालवला नांगर


सुपा / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा, कडूस परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीपाची पिके वाया गेली आहेत. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.
तालुक्यातील सुपा परिसरात वाळवणे, रुईछत्रपती, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, वाघुंडे, म्हसणे, हंगा, मुंगशी,जातेगाव आदी गावांमध्ये जून महिन्याच्या अखेरिस जेमतेम पावसावर शेतकर्‍यांनी मूग, बाजरी, मका, तूर व कांद्याच्या बीयाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. मात्र या जिरायती पट्टयात एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने संपूर्ण खरिप हंगाम अडचणीत आला आहे. पिकांची वाढ खूंटली असून, कोरडवाहू पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत. विषेश म्हणजे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला असून, विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी अजून वाढलेली नाही. खरिप पिके सुकू लागल्याने त्यांना पाणी द्यायचे कुठून असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. जनावरांचा मुख्य चारा असलेले गवतदेखील सूकून गेले असल्याने व मका, घास आदी पिकेच नष्ट होऊ लागल्याने शेतकर्‍यांच्या कुटुंबाला अर्थिक हातभार लावणारा दुग्ध व्यवसाय देखील संकटात सापडला आहे.
भोयरे गांगर्डा येथिल शेतकर्‍यांनी उभ्या पिकांना पाळ्या घातल्या आहेत. तर कडूसमध्ये पाऊसच न झाल्याने राणं अक्षरशः मोकळी आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही चांगला पाऊस होईल, या आशेवर शेतकर्‍यांनी उसनवारी करून बियाणे खरेदी केले. अल्पशा पावसावर पेरण्या केल्या. मात्र पेरलेले बियाणे वाया गेल्याने खरीप हंगामातील कमी कष्टात भरघोस उत्पन्न देणारे मूग पिकच गेल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी कोलमडली आहे. गेल्यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी कांदा हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले. साठवलेला कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. कांदा उत्पादनाचा खर्चही निघून येत नसल्याने, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तर, मूग हे नगदी पिक हातचे गेल्याने शेतकरी वर्ग विवंचणेत आहे. खरिप हंगाम तर गेलाच परंतु अशीच परिस्थिती राहिली तर, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावणार असून, रब्बी हंगामाच्या पेरण्या होतील की, नाही यासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केली आहे.

जलयुक्तच्या कामांना पावसाची प्रतिक्षा !
पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीतच जिरावा यासाठी शासनाच्यावतीने सुपा परिसरात वाळवणे, रुईछत्रपती, वाघुंडे, पळवे, कडूस, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा आदी गावात जलयुक्तच्या माध्यमातून शेतात समतल चर, बांध यांसह केटी दुरुस्ती, नाले दुरूस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र चालू वर्षी सर्वच नक्षत्र कोरडे जावू लागल्याने या कामांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.