Breaking News

शिक्षणातून कुतूहल निर्माण झाले पाहिजे : डॉ. विद्यासागर


राहुरी / ता. प्रतिनिधी
शिक्षणातून कुतूहल निर्माण झाले पाहिजे, कुतूहल निर्माण झाले की निरीक्षण व प्रयोग करून अनुमान काढणे, या गोष्टी विद्यार्थी स्वतः करून पाहतील तेंव्हा यातूनच भावी शास्त्रज्ञ घडतील असे प्रतिपादन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे नुकतीच जनसेवा प्रतिष्ठान संचलित डॉ. सी.व्ही. रामन बालवैज्ञानिक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ. विद्यासागर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी समोर दिसते त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे म्हणजे विज्ञान होय. शास्त्रज्ञ होण्याकरिता चिकाटी, आत्मविश्‍वास, निष्ठा, श्रद्धा तसेच अपयश पचविण्याची क्षमता असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक शास्त्रज्ञांचे बालपणाचे किस्से यावेळी त्यांनी सांगितले.

इस्त्रोचे शास्त्रज्ञ प्रतीक पाटील यांनी इस्त्रोमधील चालणारे संशोधन व रॉकेट प्रक्षेपण याची सविस्तर माहिती प्रोजेक्टरद्वारे बालवैज्ञानिकांना दाखवून इस्त्रोची सफर घडवून आणली. इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, शालेय स्तरापासूनच विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करून त्यांचे उपयोजन करणे आवश्यक आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग मानवी जीवन प्रगतशील व सुखी होण्याकरिता तंत्रज्ञानात होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाचे विज्ञान कथाकार डॉ. संजय ढोले यांनी फिरती विज्ञान प्रयोगशाळा या उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी प्रयोगातून विज्ञान शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र वाघ, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, मनोज धस शिक्षणविस्तार अधिकारी, राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र मंडलीक, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप फलके, प्राचार्या आशा धनवटे, भाऊसाहेब दाते, अण्णासाहेब गुंजाळ, सोपान मगर, सुहास महाजन आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण बक्षीसे देत पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व मान्यवरांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. यावर्षीपासून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक दरात इस्त्रो सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सहल प्रमुख भानुदास गव्हाणे यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिक्षा प्रमुख शैलेजा तुपविहीरे, संचालिका मालती जाधव, प्रा. लक्ष्मण जाधव, बाळासाहेब डोंगरे, सुरेश गव्हाणे, बाळासाहेब खेत्री, अनिल पवार, गणेश शिंदे, विलास देशमुख, अनिल विधाते, गोरक्ष उचाळे, संतोष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेटकर व राजश्री पिंगळे यांनी तर, आभार प्रा. शरद तुपविहीरे यांनी मानले.