Breaking News

कोळपेवाडीची घटना दहशत निर्माण करणारी : विखे


कोपरगाव /ता.प्रतिनिधी

कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायिक घाडगे यांच्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर टाकण्यात आलेल्या दरोडयाची घटना अतिशय गंभीर आहे. या घटनेने एकप्रकारे सराफ व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. सराफ व्यावसायिक आणि ग्रामस्थांचा रोष पाहाता घटनेच्या तपासाबाबत जिल्ह्यातील पोलीसांनी गांभीर्याने तपास करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 

ते म्हणाले, ग्रामस्थांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या केलेल्या मागणीचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षकांनी तातडीने पाठवावा. कोळपेवाडी येथे जादा पोलीस नियुक्त करण्याबाबत आपण पोलीस अधीक्षकांना विनंती करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. विखे यांनी मंगळवारी रात्री उशिरा कोळपेवाडी येथील घटनास्थळी भेट दिली. दरोडा टाकण्यात आलेल्या दुकानाची पाहाणी करून पोलीस अधिकार्‍यांकडून त्यांनी तपासाबाबत माहिती जाणून घेतली. घाटगे परिवाराची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष वर्मा, योगेश माळवे, मयुर माळवे, विजय नागरे, किशोर माळवे, शशि नागरे, बाळासाहेब नागरे आदी पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने श्रीरामपूर व त्यानंतर कोळपेवाडी येथील घटनेचे गांभीर्य विरोधी पक्षनेते विखे यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी तहसीलदार किशोर कदम, गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ज्येष्ठ नेते राजेंद्र जाधव, संभाजीराव काळे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, पंचायत समिती सभापती अनुसया होन, सिध्देश्वर पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती कोळपे, सरपंच सुर्यभान कोळपे आदी उपस्थित होते.