Breaking News

अवैध लिपीक देसले पत्नीसह ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी नगरपंचायतमध्ये मुख्य लिपिक या पदावर  संशयास्पदरित्या काम करणारा मुरलीधर बाजीराव देसले आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी रेखा मुरलीधर देसले [रा. नांदुर्खी, शिर्डी] या दांपत्याने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केली. त्यामुळे लाचलूचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक किशोर चौधरी यांनी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करुन या दोघांना अटक केली.
 विशेष म्हणजे लिपिक हे  पद शिर्डी नगर पंचायतीमध्ये अस्तित्वात आहे की नाही, अशी संभ्रमावस्था असतांना मुरलीधर देसले याने सेवाकाळात तब्बल १७ लाख ३० हजार ६१८ रुपये एवढी संपत्ती गोळा केली. अर्थात ही शासकीय आकडेवारी असून प्रत्यक्षात ही रक्कम किती, हा मोठा यक्षप्रश्न आहे. देसले याने डिसेंबर १९९४ ते डिसेंबर २०१० च्या १६ वर्षांच्या कालावधीत शिर्डी नगरपंचायतमध्ये काम करत असतांना उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल होती.  घटनेच्या प्रतिबंधित कायदा सन १९८८ भ्रष्टाचाराचे कलम १३ (१) (इ) सह १३ (२) प्रमाणे प्रत्यक्षदर्शनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच यातील आरोपी मुरलीधर देसले याला आरोपी नं २ रेखा मुरलीधर देसले हिने सहाय्य केल्याने त्या अनुसार भा. दं. वि १०९ प्रमाणे अपराध  केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक किशोर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  या दांपत्याला अटक झाल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली.
यासंदर्भात शिर्डी नगरपंचायतमध्ये चौकशी केली असता कामगारांमध्ये या विषयावर दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली. देसले हा गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर काम करत होता. त्यामुळे शिर्डी शहराचा त्याला मोठा अभ्यास झाला होता. यातून त्याचा मोठा जनसंपर्क झालेला होता. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली. दरम्यान, लाचलूचपतच्या चौकशीत बरीच धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. पुढील तपासात देसले काय माहिती देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.