Breaking News

अ‍ॅग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी विषयावर सेमिनार उत्साहात


अहमदनगर / प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेस 2018 या वर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधत संस्थेच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचा भाग म्हणून मंगळवारी सकाळी 11 वाजता महाविद्यालयातील विज्ञान विभागांतर्गत इंडियन अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली येथील वैज्ञानिक डॉ. एम. सी. खरकवाल यांचे अग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी विषयासंबंधित सेमिनारचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एच. झावरे, उपप्राचार्य डॉ. पंधरकर, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. गायकवाडसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. खरकवाल यांचा स्वागतपर सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच. झावरे यांनी केला. त्यानंतर दिपप्रज्वलनासह सरस्वती पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध शैक्षणिक क्षेत्रात यशस्वीपणे यश संपादन केले. त्या सर्वांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. खडकवाल यांनी मानवाने अश्मयुगापासून कशा प्रकारे शेतीमधील प्रगती केली याची सविस्तर माहिती तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकवली जाणारी शेती उत्पादने आणि हल्ली तांत्रिक पद्धतीने पिकवली जाणारी शेती उत्पादने हा संपूर्ण बदल कशा प्रकारे झाला याचे स्पष्टीकरण केले.अग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉगी क्षेत्रात विविध संशोधकांचे असणारे मौल्यवान योगदान यावरही प्रकाश टाकला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पंधरकर सर यांनी संस्थेसह महाविदयलाय कशा प्रकारे यशस्वी वाटचाल करत आहे, याचबरोबर महाविद्यालयात विविध राबवित असलेली नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्थाविक दीपाली जगदाळे यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख गिरीश कुकरेजा आणि समारोप दीपाली जगदाळे यांनी केला. कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचे निरसणदेखील डॉ. खरकवाल यांनी केले. महाविद्यालयायील विज्ञान विभागासह विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.