Breaking News

अखेर पालकमंत्र्यांनीही केला भ्रमनिरास! जिल्हा विभाजन थंडा बस्त्यातचबाळासाहेब शेटे / अहमदनगर 

‘यापूर्वीच्या सरकारने जिल्हा विभाजन केले नाही. मी मात्र १५ ऑगस्टपूर्वी हा प्रश्न सोडवून वचनपूर्ती करणारा पालकमंत्री होणार’ अशा वलग्ना केलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनीदेखील यापूर्वीच्या नेत्यांप्रमाणे नगरच्या जनतेचा भ्रमनिरास केला, असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरक्षणासाठी मध्यंतरी निघालेल्या मोर्चात हरवलेल्या पालकमंत्र्यांनी हा विषय चक्क थंडा बस्त्यात ठेवला आहे.

जिल्हा विभाजनाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. या विषयावर अनेकवेळा राजकीय पक्षांनी निवडणूका जिंकल्या आहेत. निवडणूका जाहीर झाल्या, की कोणी तरी जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुढे करीत असे. यावर उत्तरेचे नेते जनतेला वर्षानुवर्षे भुलवायचे काम करत होते आणि आताच्या पालकमंत्र्यांनीदेखील यापूर्वीच्या नेत्यांचा कित्ता गिरविण्याचा पराक्रम केला आहे. राज्यात क्षेत्रफळाने मोठा असल्याने एखाद्या अप्रिय घटनेत जिल्ह्याचे अंतिम टोक असलेल्या अकोले तालुक्यात मदत पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरते. त्यामुळे जिल्हा विभाजन अटळ आहे. 

जेव्हा केव्हा जिल्हा विभाजनाचा विषय समोर येतो, तेव्हा तेव्हा या संभाव्य जिल्ह्याचे मुख्यालय कोणते, या प्रश्नाचे ‘गुर्हाळ’ सुरु होते. संगमनेर, श्रीरामपूर आणि शिर्डी या तीन तालुक्यातील प्रत्येक नेते आपलेच ‘घोडे’ दामटवित असतात. यात जनतेच्या अपेक्षेचा कुठेही विचार केला जात नाही, हे मोठे संतापनक आहे. एखाद्या छोट्या कामासाठी सामान्य जनतेला किती त्रास होतो, याचा मात्र लोकप्रतिनिधी विचार करीत नाहीत आणि जिल्हा प्रशासनदेखील ही बाब गांभीर्याने घेत नाही. १५ ऑगस्टपूर्वी जिल्हा विभाजन झालेले असेल अशा थापा मारणारे पालकमंत्री या विषयावर अद्यापही मौनच बाळगून आहेत, त्याबद्दल जनतेमधून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.


का हवे जिल्हा विभाजन ? 

राज्यात क्षेत्रफळाने मोठा असलेल्या या जिल्ह्यात शेवटच्या टोकाला राहत असलेल्या सामान्य माणसाला प्रशासकीय कामकाजासाठी थेट नगरला हेलपाटे मारावे लागत आहेत. यात संबधितांचा वेळ आणि पैसा मोठया प्रमाणात खर्च होतो. एवढे होऊनही ते काम वेळेवर न झाल्याने सामान्य माणसाला मेल्याहून मेल्यासारखे होते. याशिवाय एखादी अप्रिय घटना घडल्यास मदतीसाठी जिल्हा प्रशासनाची मोठी दमछाक होते. त्यामुळे जिल्हा विनभाजनाचा प्रश्न निकाली निघण्याची नितांत आवश्यकता आहे.