महाराष्ट्र बंदला नेवासा शहरासह तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद


नेवासा (प्रतिनिधी) - सकल मराठा समाज बांधवांसह धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नेवासा शहर व परिसरात शंभर टक्के प्रतिसाद देण्यात आला. यावेळी श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्‍वर गणेश मंदिर चौकात चक्काजाम आंदोलन प्रसंगी मराठा, धनगर, मुस्लिम समाज बांधवांची वज्रमूठ एकवटली होती. आरक्षणाबाबत सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी. दखल न घेतल्यास आरक्षणाची लढाई ही आक्रमक होईल असा इशारा चक्काजाम आंदोलनाचे नेते भाऊसाहेब वाघ यांनी यावेळी बोलताना दिला.
नेवासा येथे खोलेश्‍वर गणेश मंदिर चौकात झालेले चक्काजाम आंदोलन सुमारे दीड तास चालले. यावेळी ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक धनगे यांनी सर्वांचे स्वागत करून सर्वधर्मीय व सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांचे स्वागत केले व प्रास्ताविकात आरक्षण बाबत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी जेष्ठ व्यापारी अशोकराव गुगळे, रम्हूभाई पठाण, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान, शिवसेनेचे बालेंद्र पोतदार, बाळासाहेब पवार, अंबादास लष्करे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे, पोपटराव जिरे, संभाजी पठाडे, महेश मापारी, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शशिकांत मतकर, कॉ.बन्सी सातपुते, शेतकरी कैलास जाधव, आण्णासाहेब पेचे, रामराव भदगले, मौलाना जाकीरभाई शेख, वसंतराव डावखर, सुहास टेमक यांनी भाषणाद्वारे आरक्षण आंदोलनाला पाठींबा दिला.
आंदोलनाचे संयोजक संभाजी माळवदे यांनी जातीसाठी राज्यातील सर्व मराठा आमदारांनी माती खावी. त्यासाठी राजीनामे द्यावेत असे आवाहन केले. ठिय्या व चक्काजाम आंदोलनाचे मार्गदर्शक भाजपचे युवा नेते अनिल ताके यांनी सरकारने अधिक अंत न पहाता आरक्षणबाबत घोषणा करावी त्यासाठी आम्ही ही पदाची पर्वा करणार नाही असा इशारा दिला.
यावेळी झालेल्या चक्काजाम आंदोलनाचे सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. तर आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. बाळासाहेब कोकणे यांनी सर्व चक्काजाम आंदोलनात पाठींबा देण्यासाठी आलेल्या सर्वधर्मीय बांधवांचे आभार मानले. यावेळी सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिक सकल मराठा,धनगर मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाला मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नेवासा शहर नेवासाफाटा, भेंडा, कुकाणा, सोनई, घोडेगाव, चांदा, सलाबतपूर, प्रवरासंगम या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेऊन बंदला पाठींबा दिला होता. नेवासा फाटा व इतर ठिकाणीही अचानक रास्तारोको करण्यात आले होते. यामुळे प्रशासनाची एकच धांदल उडाली होती. नेवासा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला छोटे व्यावसायिक देखील आपली दुकाने बंद करून चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget