Breaking News

मयत अमृता लोखंडे प्रकरणात संभाजी ब्रिगेड आंदोलन छेडणार; श्रीगोंदा पोलिसांची भूमिका संशयास्पद


श्रीगोंदा / प्रतिनिधी
तालुक्यातील भीमा नदी काठच्या गार येथील नवविवाहिता मयत अमृता अनंता लोखंडे प्रकरणाची, श्रीगोंदा पोलिसांकडून सखोल चौकशी न झाल्याने, त्या कुटुंबाला तब्बल दीड महिना उलटला तरी न्याय मिळाला नसल्याने या प्रकरणातील मयताला न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दि. 9 जुलै 2018 रोजी 8 महिन्याची गरोदर असणार्‍या अमृता लोखंडे हिचा त्यांच्याच घराशेजारी असणार्‍या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला. तो मृतदेह पाहिल्यानंतर त्याची उत्तरीय तपासणी केली असता, अहवालामध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. तसेच मृत्यूच्या दिवशीच श्रीगोंदा पोलिसांनी गार ग्रामपंचायतला मृत्यूचा दाखला का मागितला? याचे कारण काय? आत्तापर्यंत आशा किती मयतांचे मृत्यूचे दाखले मागितले? याबाबत तालुक्यात आत्तापर्यंत एकही उदाहरण नसताना मग अमृता लोखंडे साठीच श्रीगोंदा पोलिसांचा खटाटोप का होता? सदर प्रकरणात घडल्यानंतर पोलीस स्टेशनचा एकही अधिकारी कुटुंबीयांचा जाब-जबाब घेण्यासाठी का गेला नाही? पोलिसांनी एकाही संशयित व्यक्तीचा जबाब घेतला नाही, उलट संशयित आरोपींना अभय देण्यासाठी पोलिसांनी भीमा नदी काठच्या एका राजकीय पुढार्‍याला हाताशी धरून मोठी आर्थिक तडजोड करीत प्रकरण मिटवल्याचा संशय निर्माण होतोय. त्यामुळे आरोपींना पाठीशी घालणारा तो पुढारी आणि 8 महिन्याची गरोदर असणार्‍या अमृताच्या आरोपीला शिक्षा होण्यासाठी आरोपी व सदर पुढारी यांचा भांडा फोड करून मयताला न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेड यात जातीने लक्ष घालून रस्त्यावर उतरणार आहे. दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळुंज, जिल्हा सचिव राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे, तालुका उपाध्यक्ष शाम जरे, शहराध्यक्ष दिलीप लबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनात कोपर्डी घटनेतील निर्भयाचे वडील बबन सुद्रीक हेही उतरणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष युवराज चिखलठाणे यांनी दिली.

मयत अमृता लोखंडे या प्रकरणात सीआयडी चौकशी करून, न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी दिली.