Breaking News

पिंपरखेडच्या ओमासे वस्तीवरील दरोडा; दागिने आणि रोख रक्कम लंपास


जामखेड ता. प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड येथील ओमासे वस्तीवरील लबडे यांच्या घरी दरोडा टाकून दोन तोळे सोने व पाच हजार रुपये रोख रक्कम आणि जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरोडेखोरांनी लबडे यांच्या घरातून एक तोळयाचे गंठण, अर्धा तोळयाची कर्ण फुले आणि अर्धा तोळयाचे गळ्यातील बदाम असे एकूण दोन तोळे सोन्याचे दागिने आणि पाच हजार रूपये असा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी अजिनाथ पांडुरंग लबडे {ओमासे वस्ती रा. पिंपरखेड ता. जामखेड} यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. विचरंना नदीशेजारील शेताजवळील वाळूचा उपसा सुमारे दोन वर्षांपासून दौलत आढाव, भगवान पोपळे, बापू आढाव {सर्व रा. फक्राबाद } दोन वर्षांपासून वाळूचा उपसा करत आहेत. त्याठिकाणी पाणी थांबत नसल्याने त्यांना वारंवार तुम्ही वाळू उपसा करू नका, असे सांगूनही त्यांनी ऐकले नाही. फिर्यादी आणि आरोपी यांची शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर बाचाबाचीचे रूपांतर शनिवारी {दि. २५ } रात्री साडेबारा वाजता सुमारास तिघे आरोपी आणि सोबतचे वाळूतस्कर अनोळखी पाच मजूर फिर्यादी लबडे यांच्या घरात जाऊन चाकूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जबर जखमी केले. यामध्ये अजिनाथ लबडे यांच्या मांडीवर आणि हातावर चाकूने वार करून जबर जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. ना. दिनानाथ पातकळ, पो. कॉ. गहिनीनाथ यादव हे करत आहेत.