Breaking News

पाझर तलावास सिमेेंट काँक्रीटची भिंत व्हावी; जि.प सदस्या काकडे यांची मागणी


तालुक्यातील गोळेगाव येथील पतळगंगा नदीवर असलेल्या पाझर तलावाच्या मातीच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रीटची भिंत व्हावी असे निवेदन ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना जि.प.सदस्या. हर्षदा काकडे व गोळेगाव ग्रामस्त यांनी आज मुंबई येथे दिले.
गोळेगावकरांच्या महत्वाच्या प्रश्‍नासंदर्भात आज गोळेगाव ग्रामस्त व हर्षदा काकडे यांनी ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, सदर नदीवरील मातीचा बंधारा सन 1971 साली दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून करण्यात आला. सध्या त्यामधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या बंधार्‍याची दोन डोंगराच्या नैसर्गिक साईटवर निर्मिती होवून त्यामध्ये 15.18 दशलक्ष घन फुट पाणी साठवण्याची क्षमता आहे. या परिसरात चांगले पर्जन्यमान असते. तसेच यासाठी कुठलीही जमीन संपादित केलेली नाही.
गोळेगाव नागलवाडी, आदी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. दरवर्षी ट्रॅकरवर प्रचंड पैसा शासनाला खर्च करावा लागतो. तसेच शेतीसाठीसुद्धा कुठलाही शाश्‍वत पाणी पुरवठा नाही. त्यामुळे पर्जन्यमान जास्त असूनही, हा भाग सतत दुष्काळाच्या छायेत असतो. त्यामुळे या तलावाच्या मातीच्या भिंती ऐवजी काँक्रीटची सिमेंट भिंत बांधल्यास गोळेगाव, राणेगाव, नागलवाडी, लाडजळगाव, बोधेगाव, आधोडी, दिवटे, शोभानगर, आदी गावांचा पिण्याच्या व काहींच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. तसेच प्रशासनाचा ट्रॅकरवर होणारा खर्चही वाचू शकतो. परिसरातील वन्यजीव संपदा, औषधी वनस्पती यांचे संगोपन व संवर्धन होऊ शकते. रामायण काळातील प्राचीन श्रीक्षेत्र काशी केदारेश्‍वर देवस्थान या परिसरातच आहे. त्यामुळे हा भाग निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होऊ शकतो. असेही काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सरपंच विजय साळवे, उपसरपंच मुक्ता आंधळे, संजय आंधळे, बाळासाहेब फुंदे, नवनाथ फुंदे, शिवाजी रासनकर, अर्जुन बर्डे, रामभाऊ डमाळे, भाऊसाहेब फुंदे, नवनाथ सानप, पांडुरंग बर्डे, महादेव काशीद, अनिल फुंदे, बाळासाहेब बर्डे, निपाण शेख, कारभारी आंधळे यांच्या सह्या आहेत.