Breaking News

एसटी कर्मचारी आणि महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना १० कोटी रुपयांची मदत




मुंबई : केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी एसटीचे कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचारी तसेच महामंडळाच्या वतीने 10 कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात एसटीच्या मान्यताप्राप्त तसेच इतर कामगार संघटनांसमवेत बैठक झाली. त्यात केरळ येथील पूरग्रस्तांना कामगारांमार्फत मदत करण्याबाबत चर्चा झाली. सर्व कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना मदतीसाठी देण्याची तयारी दर्शविली. पण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून फक्त अर्ध्या दिवसाचे वेतन देण्यात यावे आणि त्यात तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्यात यावी, अशी सूचना श्री. रावते यांनी केली. त्यानुसार मदतीचा 10 कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्री. रावते यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, एसटी कर्मचारी सर्वश्री रामदास पवार, योगेश मुसळे, नितीन गदमळे, आप्पा वरपे, कमलाकर साळवे, संदीप कातकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. रावते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांनी तसेच एसटी महामंडळाने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची नेहमीच भूमिका घेतली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एसटी कर्मचारी आणि महामंडळ पुढे सरसावले होते. आता केरळ राज्यावर मोठे संकट कोसळले असून तेथील नागरिकांना मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून तयारी दर्शविली. कर्मचाऱ्यांची ही भूमिका मानवतेची तसेच इतर सर्वांसाठी आदर्शवत अशी आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीत एसटी महामंडळामार्फतही तेवढेच योगदान देऊन हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला, असे त्यांनी सांगितले.